Join WhatsApp group

Ads

परवानगी एकीकडे, उत्खनन दुसरीकडे; मूर्तिजापूर हद्दीत रेती उपसा?

By Sarkar Maza

March 18, 2026 5:23 pm

Ads

दिनांक – १८ मार्च :
लासूर रेती घाटावरील अवैध उत्खनन प्रकरण अधिकच गहिरे होत असून आता मूर्तिजापूर तहसील प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दर्यापूर तालुक्याच्या नावाखाली सुरू असलेल्या या रेती उपशामध्ये प्रत्यक्षात मूर्तिजापूर हद्दीचा समावेश असल्याची चर्चा रंगत आहे.

विशेष म्हणजे, हा घाट मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी अंतर्गत येत असल्याची चर्चा असून, स्थानिक नागरिकही तसेच म्हणत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. जर हा भाग खरोखरच घुंगशी हद्दीत येत असेल, तर मूर्तिजापूर तहसील प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही कारवाई का केली नाही, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

नियमांनुसार, आपल्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या खनिज उत्खननावर नियंत्रण ठेवणे ही तहसील प्रशासनाची जबाबदारी असते. मात्र, पूर्णा नदीतील पाण्याखालील भागातून मोठ्या प्रमाणात पोकलेन, जेसीबी आणि बोटींच्या सहाय्याने सुरू असलेल्या रेती उपशाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक नागरिक संतप्त प्रतिक्रिया देताना म्हणतात, “दिवसाढवळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे, मग प्रशासनाला दिसत नाही का? की मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे?” काही नागरिकांनी तर या प्रकरणात संगनमताचा संशयही व्यक्त केला आहे.

दरम्यान, घुंगशी हद्दीचा मुद्दा पुढे येत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. सीमारेषा स्पष्ट करून नेमका घाट कोणत्या तालुक्यात येतो, हे निश्चित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

एकूणच, लासूर रेती घाट प्रकरणात मूर्तिजापूर तहसील प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!