Join WhatsApp group

Ads

-

दुःखावर मात करत कर्तव्याचा मार्ग : सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार

By Sarkarmzanews

February 10, 2026 11:04 am

Ads

मुंबई | दिनांक १० |

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असताना, त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज त्या औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत.

28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन मोठा स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण राज्य हादरले असून पवार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या भीषण घटनेनंतर सुनेत्रा पवार पूर्णतः कोलमडून गेल्या होत्या. मात्र, नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी अवघ्या चार दिवसांत, 31 जानेवारी रोजी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर लोकभवन येथे राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

शपथविधीला दहा दिवस उलटल्यानंतर आज सुनेत्रा पवार औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार असून, पदभार स्वीकारल्यानंतर त्या आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही त्या भेट देणार आहेत.

महत्त्वाची मंत्रालये सुनेत्रा पवारांकडे

सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेले पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या वापरातील मंत्रालयीन दालने आणि शासकीय निवासस्थानही सुनेत्रा पवार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दर्शन, अभिवादन आणि कर्तव्याची सुरुवात

आज सकाळी पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पांचे दर्शन घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर त्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार असून, विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मंत्रालयात पदभार स्वीकारतील.

व्यक्तिगत दुःखावर मात करत राज्याच्या सेवेसाठी पुढे येणे, हे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची आणि कर्तव्यनिष्ठेची साक्ष देणारे पाऊल मानले जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!