Join WhatsApp group

Ads

शाळांमध्ये HFSS पदार्थांवर नियंत्रणासाठी मुख्याध्यापकांची कार्यशाळा

By Sarkarmzanews

August 26, 2026 10:41 am

Ads

अकोला : विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शाळांमधील अन्नाची सुरक्षितता याबाबत जनजागृती करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, अकोला आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी अकोला जिल्ह्यात मुख्याध्यापकांसाठी सहा कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळांना जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे १,८४७ मुख्याध्यापकांनी सहभाग घेतला.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या HFSS (High Fat, High Sugar, High Salt) म्हणजेच जास्त चरबी, साखर आणि मीठ असलेल्या खाद्यपदार्थांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. चिप्स, कँडी, शीतपेय, काही बेकरी पदार्थ तसेच तळलेले पदार्थ यांचे अतिसेवन टाळण्याचे आवाहन करण्यात आले. अशा पदार्थांच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा, मधुमेहासह आरोग्याशी संबंधित विविध समस्या निर्माण होण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले.

शाळांच्या परिसरात HFSS पदार्थांवर नियंत्रण

शाळेच्या परिसरात जंक फूड आणि HFSS पदार्थांची विक्री व जाहिरात रोखण्याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सकस व संतुलित आहाराची सवय लागावी, यासाठी मुख्याध्यापकांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.

‘ईट राईट स्कूल’ उपक्रमांतर्गत शाळांमधील अन्नाची स्वच्छता, सुरक्षितता आणि पौष्टिकतेवर विशेष भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या डब्यामध्ये ताजी फळे, उकडलेली कडधान्ये आणि इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याबाबत पालकांचे प्रबोधन करण्याचे आवाहनही करण्यात आले.

शालेय कँटीनसाठी अन्न सुरक्षा नियमांचे पालन आवश्यकशाळांमधील कँटीन चालक व खाद्यपदार्थ पुरवठादारांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच आवश्यक परवाने व नोंदणी पूर्ण करूनच खाद्यपदार्थांची विक्री करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

या कार्यशाळा अन्न व औषध प्रशासन, अकोला येथील सहायक आयुक्त (अन्न) दे. गो. वीर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी प्र. नि. काळे, र. वा. सोळंके आणि कि. ह. बोरचाटे, तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये निरोगी आहाराची संस्कृती रुजवून सुदृढ पिढी घडविण्यासाठी शाळांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. उपस्थित मुख्याध्यापकांनी मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प केला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!