Join WhatsApp group

कुख्यात गुन्हेगार अनंत कौन्सकरला एका वर्षासाठी तुरुंगवास

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : ८ जुलै २५ : उरळ गावात दहशतीचे पर्याय ठरलेला कुख्यात गुन्हेगार अनंत रामकृष्ण कौन्सकर (वय ३६) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करत जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी एका वर्षासाठी तुरुंगवासाचे आदेश दिले.

कौन्सकर याच्यावर प्राणघातक हल्ला, जबर मारहाण, जबरदस्तीने घर ताब्यात घेणे यासह गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे उरळ पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ‘शून्य सहनशीलता’ धोरणाअंतर्गत, गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी ही कठोर कारवाई करण्यात आली.

उरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी कौन्सकर विरोधात प्रस्ताव तयार केला. तपासणी आणि मान्यता प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्याला वर्षभरासाठी तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले.

या कारवाईत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी गजानन पडघन, पीएसआय माजिद पठाण, ज्ञानेश्वर साईरिस, तसेच पोलीस कर्मचारी पंकज कांबळे, अरुण मुंडे, विजय झाकरडे यांचा मोलाचा सहभाग होता.

२०२५ सालात आतापर्यंत ११ गुन्हेगारांवर अशीच कठोर कारवाई करण्यात आली आहे.

अनंत कौन्सकरसारख्या गुन्हेगाराला एमपीडीए अंतर्गत एका वर्षासाठी तुरुंगात पाठवण्याची कारवाई ही स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी आहे.

अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसवण्यासाठी प्रभावी ठरणार आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!