Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूरचा निकाल ठरतोय डोकेदुखी : शिंदे गटात वर्चस्वाची लढाई उफाळली

By Sarkarmzanews

December 22, 2025 6:36 pm

Ads

मुर्तिजापूर | दिनांक २२ :

मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिवसेना (शिंदे गट) मध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. निवडणुकीत पक्षाशी गद्दारी झाल्याचे आरोप एकमेकांवर होत असून, काही पदाधिकारी व नेत्यांच्या अवैध व्यवसाय व गैरकारभारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाला केवळ दोन नगरसेवकांवर समाधान मानावे लागल्याने पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे. या निकालाचा फटका येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना बसू नये, यासाठी पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अवैध व्यवसाय, पक्षविरोधी हालचाली आणि निवडणुकीदरम्यान झालेल्या कथित गद्दारीच्या आरोपांच्या फैरीत काही मातब्बर नेत्यांवर शिस्तभंगाची, अगदी हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या निवडणुकीत सुमारे २५ लाख रुपयांच्या घोळाची चर्चा देखील अंतर्गत पातळीवर रंगली आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी इतर पक्षातून आलेल्या हौशी नेत्यांना अद्याप कोणतेही पद न मिळाल्याने ते नाराज होते. याच नाराजीपोटी काही कार्यकर्त्यांनी निवडणुकीत शिंदे गटाच्या पाठीमागे खंजीर खुपसल्याचा आरोप पक्षांतर्गत केला जात आहे.

हा सगळा प्रकार केवळ घरातील शिस्तभंग आणि अंतर्गत वाद आहे की पक्षातील वर्चस्वासाठी सुरू असलेली गंभीर सत्ता-संघर्षाची लढाई, असा प्रश्न आता राजकीय निरीक्षक उपस्थित करत आहेत.
मुर्तिजापूरचा हा निकाल फक्त एक इशारा ठरणार की शिंदे गटातील मोठ्या राजकीय उलथापालथीची नांदी ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!