Join WhatsApp group

Ads

--

राज्यात एटीएसची मोठी कारवाई; अहिल्यानगर, यवतमाळसह अनेक ठिकाणी छापेमारी, संशयितांची चौकशी सुरू

By Sarkar Maza

February 15, 2026 3:16 pm

Ads

दहशतवादी संघटनांशी संपर्काच्या संशयावरून तातडीची कारवाई; राज्यभर खळबळ

न्युज डेस्क : दिनांक १५ : राज्यात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत अहिल्यानगर, यवतमाळसह अनेक ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली. काही तरुण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानंतर ही तातडीची कारवाई करण्यात आली असून अनेक संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

एटीएसने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड येथे सुमारे १४ ठिकाणी छापे टाकले, तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. सकाळपासून जवळपास २१ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे समजते. दहशतवादी संघटनांच्या संपर्कातून काही तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अहिल्यानगरमधील मुकुंदनगर परिसरात मध्यरात्री एटीएसने छापेमारी केली. कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडली असून स्थानिक नागरिकांचीही चौकशी करण्यात आली. गेल्या काही वर्षांत या भागात काही वादग्रस्त घटनांमुळे चर्चा झाली होती. त्यानंतर आता एटीएसच्या कारवाईमुळे पुन्हा हा परिसर चर्चेत आला आहे.

दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात एटीएसची तब्बल २० पथके दाखल झाली असून उमरखेड आणि पुसद परिसरात संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. या कारवाईत वरिष्ठ आयपीएस अधिकारीही सहभागी झाले आहेत.

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत रात्रभर गोपनीय हालचाली सुरू होत्या.

महाशिवरात्री, शिवजयंतीसह विविध सणांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य घातपाताचा संशय बळावल्याने एटीएसने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, काहींना ताब्यात घेण्यात आले असले तरी अद्याप कोणाला अटक करण्यात आली आहे का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तपास सुरू असून पुढील घडामोडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

फोटो – Ai genrated

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!