Join WhatsApp group

Ads

-

रुद्रपूरमध्ये महाराष्ट्राचा झेंडा फडकला;राष्ट्रीय कॅडेट तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई

By Sarkar Maza

May 30, 2026 12:48 pm

Ads

Nasik : उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे सुरू असलेल्या 21व्या राष्ट्रीय कॅडेट तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एपी (Épée) सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. देशभरातील अव्वल संघांमध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये महाराष्ट्राने आपली गुणवत्ता सिद्ध करत पदकावर नाव कोरले.

दिनांक 28 मे रोजी पार पडलेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात महाराष्ट्राचा सामना बलाढ्य हरियाणा संघाशी झाला. अत्यंत अटीतटीच्या आणि रोमांचक झालेल्या या लढतीत महाराष्ट्राला पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्यानंतर संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदकावर कब्जा केला.

महाराष्ट्राच्या पदकविजेत्या संघात सारंग शेटकर (नाशिक), जानवी जाधव (लातूर), विधी पाटील (पुणे) आणि किरा पुरंदरे (मुंबई) यांचा समावेश होता. या सर्व खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य, चिकाटी आणि संघभावना दाखवत महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून दिला.

स्पर्धेतील अंतिम निकालानुसार हरियाणा संघाने सुवर्णपदक, पंजाबने रौप्यपदक, तर महाराष्ट्र आणि मणिपूर यांनी संयुक्त कांस्यपदक मिळविले.

या यशामागे प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचेही मोठे योगदान राहिले. महाराष्ट्राच्या खेळाडूंना अजिंक्य दुधारे, स्वामी, श्वेता चंडालिया, दत्ता गलाले, जय शर्मा आणि राजू शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्राच्या या यशाबद्दल भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष अशोक दुधारे, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष शिवाजीराजे जाधव, सरचिटणीस डॉ. उदय डोंगरे, खजिनदार राजकुमार सोमवंशी तसेच राजू शिंदे यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!