Join WhatsApp group

Ads

-

लेआउट मंजुरीचा ‘रेटकार्ड’ उघड, लेआउट पास करण्यासाठी लाचेचा सौदा; दोन अधिकारी आणि इंजिनिअर ACBच्या कारवाईत अडकले

By Sarkar Maza

March 11, 2026 8:45 am

Ads

अमरावती : दिनांक ११ : अमरावतीतील नगररचना विभागातील भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघडकीस आला असून लेआउट मंजुरीसाठी १ लाख रुपयांची लाच घेताना दोन सहाय्यक नगररचनाकारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या प्रकरणात एका खाजगी इंजिनिअरलाही अटक करण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

फोटो – AI Generated

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती पथकाने मंगळवारी (१० मार्च) सायंकाळी ही सापळा कारवाई केली. या कारवाईत गौरव अरुण भगत (३८) आणि तुषार अनिल नंद (३८) हे दोघे सहाय्यक नगररचनाकार अडकले आहेत. तर अमन सुभाष भंडारी (२८) हा खाजगी इंजिनिअर या प्रकरणातील तिसरा आरोपी आहे.

तक्रारदाराच्या कुटुंबाच्या नावावर मौजे खेळतपमाळी (ता. अचलपूर) येथे सर्व्हे क्रमांक १०८/१/अ मध्ये सुमारे ९७ आर शेती जमीन आहे. या जमिनीवर निवासी वापरासाठी लेआउट मंजूर करून घेण्यासाठी तक्रारदाराने शासनाच्या BPMS ऑनलाईन प्रणालीद्वारे नगररचना विभागाच्या अमरावती कार्यालयात अर्ज केला होता.

तक्रारदाराने नगररचना कार्यालयात भेट दिली असता आरोपी अधिकाऱ्यांनी हा लेआउट सुमारे २५ एकर क्षेत्राचा असल्याचे सांगत ४० हजार रुपये प्रति एकर दराने लाच मागितली. अखेरीस तडजोडीअंती १ लाख रुपयांत काम करून देण्याचे ठरले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला.

तक्रार मिळाल्यानंतर ACBने पडताळणी केली. त्यात गौरव भगत यांनी १ लाख रुपयांची मागणी केल्याचे, तसेच तुषार नंद यांनी त्या मागणीला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला.

मंगळवारी सायंकाळी ४.०२ ते ४.३३ वाजताच्या दरम्यान तक्रारदाराकडून १ लाख रुपये घेतल्यानंतर भगत यांनी ती रक्कम टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवली. दरम्यान, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खाजगी इंजिनिअर अमन भंडारीने ती रक्कम स्वतःच्या पँटच्या खिशात लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र पंचांच्या सूचनेनंतर ACB पथकाने त्याला ताब्यात घेत रक्कम जप्त केली.

या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ACBने दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील किणगे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात निरीक्षक, कर्मचारी आणि पंचांनी सहभाग घेतला.

दरम्यान, नागरिकांनी सरकारी कामासाठी लाच मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन ACBने केले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच ACB अमरावती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!