Join WhatsApp group

Ads

अकोल्यातील सराफा जबरी चोरीचा गुन्हा ७२ तासांत उघडस्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; आरोपी अटकेत, पिस्टलसह २५.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Sarkar Maza

May 12, 2026 12:56 pm

Ads


अकोला : शहरातील गाजलेल्या श्री सप्तश्रृंगी ज्वेलर्स सराफा जबरी चोरी प्रकरणाचा अवघ्या ७२ तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा आणि अकोला पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्टल तसेच तब्बल २५ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीस १६ मे २०२६ पर्यंत सहा दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड (PCR) सुनावला आहे.


दि. ७ मे २०२६ रोजी जितेंद्र भास्करराव विसपुते (वय ५४), व्यवसाय – सराफा व्यापारी, श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्र, आदर्श कॉलनी, अकोला यांनी पोलिस स्टेशन खदान येथे तक्रार दाखल केली होती. दुपारी सुमारे १२.४५ ते १ वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात इसम दुकानात शिरला व पिस्टलचा धाक दाखवत सोने-चांदीचे दागिने आणि ७५ हजार रुपये रोख असा एकूण ६९ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लुटून फरार झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी भा.न्या.संहिता कलम ३०९ तसेच आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

५८० ठिकाणांचे CCTV फुटेज तपासले


गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तयार करण्यात आली. शहरातील विविध डीबी पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मिळून तब्बल ५८० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांची मदत आणि सततचा पाठलाग करत पोलिसांनी आरोपीपर्यंत धागेदोरे मिळवले.


तपासादरम्यान पोलिसांनी जवळपास ७०० किलोमीटरचा प्रवास करत आरोपीचा शोध घेतला. अखेर आरोपी रोहनसिंग सतनामसिंग बावरा (रा. जामनेर रोड, भुसावळ, जि. जळगाव) याचे नाव निष्पन्न झाले.

भुसावळ येथे सापळा रचून अटक


स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी भुसावळ येथे जाऊन गुप्त माहितीच्या आधारे अडका रोड परिसरात सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिस तपासात आरोपीने अकोल्यात भाड्याने खोली घेऊन चादर विक्रीचा व्यवसाय करत परिसराची रेकी केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर ७ मे रोजी दुपारी श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्रात बंदुकीच्या धाकावर जबरी चोरी केली होती.


पिस्टलसह लाखोंचा मुद्देमाल जप्त


आरोपीकडून सुमारे १६० ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत अंदाजे २४ लाख रुपये, ४४० ग्रॅम चांदीचे दागिने किंमत १ लाख २३ हजार २०० रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेला विदेशी बनावटीचा देशी कट्टा असा एकूण २५ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी


ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सायबर विभाग आणि शहरातील डीबी पथकांनी संयुक्तरीत्या पार पाडली. अनेक अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!