Join WhatsApp group

Ads

-

अनभोरा जवळ भीषण अपघात; ट्रक-टेलरच्या धडकेत युवक ठार, तिघे जखमी

By Sarkar Maza

May 24, 2026 7:07 pm

Ads

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. अनभोरा गावाजवळ भरधाव ट्रक-टेलरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाजवळील चौघांना जोरदार धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला.

या प्रकरणी मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अप क्र. 231/2026 अन्वये कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) बीएनएस 2023 तसेच सहकलम 184 मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास NPC दिनेश सोळंके हे करीत आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रविण दीपक वानखडे (वय 32, रा. सिद्धार्थ नगर, बोरगावमंजू) यांचा भाऊ पवन दीपक वानखडे (वय 27) हा त्याचे साथीदार रोहित गोटमारे यांच्यासह सरगम बँड पार्टीच्या वाहनाने कारंजा येथून मुर्तिजापूर मार्गे बोरगावमंजूकडे जात होता. दरम्यान, अनभोरा गावाजवळ वाहनाचा टायर पंचर झाल्याने ते रस्त्याच्या कडेला थांबून स्टेपनी बदलत होते.

यावेळी पवन वानखडे व इतर साथीदार टायरचे नट घट्ट करत असताना मुर्तिजापूरकडून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात ट्रक-टेलरने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेत पवन वानखडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोहित गोटमारे, तौफिक शाह आणि सतीष वानखडे हे जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून फरार ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!