Join WhatsApp group

खंडणीची रक्कम चेकद्वारे घेऊनही पुन्हा २० लाखांची मागणी; पीडित भूमालक भयभीत

Photo of author

By Sarkarmzanews

Share

खंडणी मध्ये माजी नगर सेविकेचा पती आणि माजी नगर सेवकाचा भाऊ यांचा समावेश

दिनांक २९ जून २५ :

अकोला – शहरातील भूखंड बळकावून खंडणी मागणाऱ्या टोळ्यांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत असून पोलिस प्रशासनाच्या भूमिकेमुळे गुन्हेगारांची मनधैर्य बळावली आहे. अशाच एका धक्कादायक प्रकारात, समीर नावाच्या व्यक्तीने एका बांधकाम व्यावसायिकाच्या भूखंडावर बेकायदेशीरपणे कब्जा केला आणि दीड लाखांची खंडणी वसूल केली. ही रक्कम चेकद्वारे घेण्यात आली होती, शिवाय प्लॉट रिकामा करण्यासाठी नोटरी केलेल्या बॉन्डवरही स्वाक्षरी करण्यात आली होती. ही घटना २०२३ साली घडली होती.

मात्र या प्रकारानंतरही संबंधित व्यावसायिकाला पुन्हा त्रास देण्यात येत आहे. समीर आणि त्याच्या साथीदारांनी भूखंडावर पुन्हा कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू केला असून यावेळी १० लाख रुपयांची खंडणी मागितली गेली. विशेष म्हणजे, व्यावसायिकाने या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर खंडणीची रक्कम थेट २० लाखांवर नेण्यात आली असून, पैसे न दिल्यास जीव घेण्याची धमकीही दिली गेली आहे.

या प्रकारामुळे पीडित व्यावसायिक घाबरला असून, त्याने आपल्या कुटुंबासह अकोला शहर सोडले आहे. सध्या तो लपूनछपून जीवन जगत आहे. दुसरीकडे, पोलिस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी, आरोपींचे मनोबल वाढले असून, ते उघडपणे धमक्या देत असल्याचे सांगितले जात आहे.

खंडणी मागणाऱ्या व्यक्तींमध्ये एका माजी नगरसेविकेचा पती आणि तिचा भाऊ यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. पीडित व्यावसायिकाने याप्रकरणी पोलिस महासंचालक, अमरावती विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक आणि शहर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी दिल्या आहेत.

शहरातील रिकाम्या भूखंडांवर कब्जा करून खंडणी मागण्याचे प्रकार सध्या वाढत असून, यामुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत पोलिस प्रशासन किती तत्परतेने कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!