Join WhatsApp group

Ads

रायपूरपर्यंत पलायन, अमरावतीत अटक; मंदिर चोरीचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात : LCBची मोठी कारवाई

By Sarkar Maza

March 12, 2026 9:21 am

Ads

अकोट | प्रतिनिधी

अकोट शहरातील बहुचर्चित कालंका माता मंदिरातील दागिने चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अखेर पर्दाफाश केला आहे. रायपूर (छत्तीसगड) येथे पळ काढलेल्या आरोपीला पोलिसांनी अकोल्याकडे परत येत असताना अमरावती येथे अटक केली. या कारवाईत आरोपीकडून ७ लाख २१ हजार ६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या संदर्भात २२ फेब्रुवारी २०२६ रोजी अकोट शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी चंद्रशेखर भीमराव गावंडे (रा. अकोट) यांनी तक्रार दाखल केली होती. बारगण परिसरातील कालंका माता मंदिरात अज्ञात चोरट्याने देवीच्या मूर्तीवरील दागिने व दानपेटीतील रोकड चोरी केली होती. यात ४८ ग्रॅम सोने, ७५० ग्रॅम चांदी आणि १५ हजार रुपयांची रोकड असा सुमारे ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील ११० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला.

तपासात हा गुन्हा अमोल काशीराम तेलगोटे (वय ३९, रा. रिधोरा, ता. बाळापूर, जि. अकोला) याने केल्याचे स्पष्ट झाले. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रायपूर (छत्तीसगड) येथे रवाना झाले होते. मात्र आरोपी अकोल्याकडे परत निघाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला आणि अखेर अमरावती येथे त्याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची बिस्किटे, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची लगड, मोबाईल फोन, दागिने वितळविण्याची उपकरणे, हायड्रॉलिक कटर तसेच बजाज पल्सर मोटारसायकल असा एकूण ७,२१,०६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस तपासात आरोपी अत्यंत चलाखीने चोरी करत असल्याचे समोर आले. चोरी करताना तो स्वतःचा मोबाईल बंद ठेवत असे व दुसऱ्याच्या विनानंबरच्या मोटारसायकलीचा वापर करत असे. तसेच चोरी केलेले दागिने ओळखू येऊ नयेत म्हणून तो स्वतःच ते वितळवून नवीन आकार देत असे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व उपकरणेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी १२०० किलोमीटरहून अधिक प्रवास केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके, तसेच पोलीस अधिकारी स्था.गु.शा. प्रमुख, सपोनि विजय साण, पोउपनि विष्णु बोडो, गोपाल जाधव, गाजीद पठाण पोलीस अंमलदार घोहवा, सुलतान पठाण, वसिमोच्चीम, एजाज अहमद, महेंद्र मलीऐ, भास्कर धोत्रे, पोसि. अन्सार अहमद, राम चंदेल, सतीष पवार, करण मानकर, अभिषेक पाठक, भिमराव दिपकके, अशोक सोनवणे, राहूल गायकवाड यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!