Join WhatsApp group

Ads

तहसीलदारांवर रेती माफियाचा जीवघेणा हल्ला; तहसील कार्यालयात खळबळ

By Sarkar Maza

April 24, 2026 6:00 pm

Ads

अवैध रेती वाहतुकीवर कारवाई केल्याचा राग मनात धरून रेती माफियाने थेट तहसील कार्यालयात घुसून तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना नांदुरा येथे घडली. या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

माहितीनुसार, तहसीलदार अजितराव जंगम हे 23 एप्रिल रोजी सकाळी सुमारे पावणेअकराच्या सुमारास आपल्या कक्षात कामकाजात व्यस्त असताना आरोपी समाधान भगवान मोरे हा थेट त्यांच्या केबिनमध्ये घुसला. त्याने मागून लोखंडी वस्तूने जंगम यांच्या डोक्यावर प्रहार करत जीवघेणा हल्ला केला.

त्यानंतर आरोपी व त्याच्या साथीदाराने गळा पकडून चापटाबुक्क्यांनी मारहाण करत शर्ट फाडला. “तू वाळूच्या गाड्या पकडतोस, तुला जिवंत सोडणार नाही,” अशी उघड धमकीही देण्यात आली.

दरम्यान, हस्तक्षेप करण्यासाठी धावलेल्या नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांनाही आरोपींनी धमकावत मारहाण केली. “तुला पकडतोस काय, पोटात सुरा खुपशीन,” अशा शब्दांत त्यांना धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे तहसील कार्यालयात काही काळ भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेपूर्वी तहसीलदार जंगम यांनी मोताळा रोडवरील नांदुरा बायपासवर अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर (एमएच-२८-एबी-७६३८) जप्त करून त्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली होती.

याच कारवाईचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.या प्रकरणी नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी समाधान मोरे व त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, महसूल अधिकाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी खामगाव येथेही तहसीलदार सुनील पाटील यांच्यावर रेती कारवाईदरम्यान वाहन चढवून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अवैध वाळू तस्करीविरुद्ध कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरेशी सुरक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

फोटो – AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!