Join WhatsApp group

Ads

एकाच दोरीला दोन जणांचे मृतदेह,WhatsApp चिठ्ठीनंतर झाले उघड

By Sarkar Maza

May 12, 2026 7:51 pm

Ads

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाणे हद्दीत एकाच दोरीला दोन व्यक्तींनी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

मृतकांमध्ये कीशोर बळीराम सोनटक्के (वय ४०, रा. कानडी ता. मुर्तिजापूर जि. अकोला) व कीशोर मारोती बोडखे (वय ६०, रा. वरुड ता. मंगरुळपीर जि. वाशिम) यांचा समावेश आहे. दोन्ही मृतक ९ मे २०२६ पासून घरातून बेपत्ता होते. त्यानंतर मृतक क्र. १ संदर्भात पिंजर पोलीस ठाण्यात तर मृतक क्र. २ संदर्भात मंगरुळपीर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, १० मे रोजी मृतक कीशोर सोनटक्के यांचा भाचा रोहन दत्तात्रय महल्ले (रा. शेलू खुर्द, ता. बार्शीटाकळी) याला त्याच्या मामाने WhatsApp वर एक चिठ्ठी पाठविल्याची माहिती समोर आली. त्या संदेशामध्ये दोघांनी महान धरणाजवळील बिहाड माथा शेतशिवारातील जंगल परिसरात निंबाच्या झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले होते.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मृतकांनी नातेवाईकांना केलेला शेवटचा फोन, त्याचे रेकॉर्डिंग, WhatsApp वर प्राप्त झालेली सुसाईड नोट, घटनास्थळावरील परिस्थिती तसेच मोबाईल डेटा यावरून प्रथमदर्शनी आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अंतिम निष्कर्ष पोस्टमार्टम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान WhatsApp संदेश, कॉल रेकॉर्ड, मोबाईल तांत्रिक माहिती, पीएम रिपोर्ट आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संपूर्ण घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी शंकर शेळके, बार्शीटाकळीचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ तसेच पिंजर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर दराडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

PHOTO – GENRATED AI

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!