Join WhatsApp group

Ads

जुन्या वादाची रक्तरंजित परिणती, पोलिसांची झटपट कारवाई, ६ आरोपी अटकेत

By Sarkar Maza

March 11, 2026 9:05 am

Ads

अकोट : दिनांक ११ :
अकोट शहरातील राजेंद्रनगर परिसरात जुन्या आपसी वादातून झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात अकोट शहर पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या काही तासांत सहा आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. दुर्गा लखन अंभोरे (वय ३२, रा. राजेंद्रनगर, खानापूर वेस, अकोट) यांनी अकोट शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांच्या परिसरात राहणारा राम पांडुरंग अंभोरे आणि त्याच्या साथीदारांनी जुन्या वादातून त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. ९ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून देखन अंभोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला.

आरोपींनी लोखंडी पाईप, बकू, दगड आणि विटांचा वापर करत बेदम मारहाण केल्याने लखन अंभोरे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी अकोल्यातील आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच १० मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक निखील पाटील आणि अकोट शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल माळवे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली.

तपासादरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत पोलिसांकडून हल्ल्याचे नेमके कारण, वापरण्यात आलेली शस्त्रे तसेच घटनेतील इतर संभाव्य आरोपींचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि सहायक पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल माळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शमुवेल वानखेडे, डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते, उपनिरीक्षक अविनाश मोहिते, उपनिरीक्षक समाधान मिसाळ यांच्यासह डीबी पथकातील पोलीस कर्मचारी नरेंद्र जाधव, गणेश सोळंके, गजानन राठोड, विपुल सोळंके, कपिल राठोड, सुबोध खंडारे, नितेश सोळंके आणि मोहन दुर्गे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

दरम्यान, या घटनेमुळे अकोट शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तपास पुढे सुरू असून या प्रकरणातील इतर बाबींचाही शोध घेतला जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!