Join WhatsApp group

Ads

अकोल्यात टॉवर चौकात पोलिसांच्या नाकावर टिच्चून “काळा-पिवळा” जुगार सुरू

By Sarkar Maza

May 22, 2026 5:03 pm

Ads

टॉवर चौक परिसरात दिवसा ढवळ्या सुरू अवैध खेळ; पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू प्रकारामुळे संताप

अकोला : शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अकोल्यातील अत्यंत वर्दळीच्या टॉवर चौक परिसरात “काळा-पिवळा” नावाचा अवैध जुगाराचा खेळ खुलेआम सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विदर्भ मार्केट समोर दिवसा ढवळ्या हा प्रकार सुरू असून, सामान्य नागरिकांना रस्त्यात अडवून पैशांचे आमिष दाखवत जुगार खेळण्यास भाग पाडले जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

“१० रुपयाला १०० रुपये” असे आमिष दाखवत काही जण रस्त्यावरच मंडळी जमा करून हा खेळ चालवत आहेत. शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ आणि वाहतुकीच्या गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, या परिसरात कायम ट्रॅफिक पोलिसांची उपस्थिती असते, तरीही त्यांच्या समोरच हा अवैध खेळ सुरू राहत असल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार एखाद्या लपूनछपून चालणाऱ्या जुगार अड्ड्यासारखा नसून, उघडपणे रस्त्यावर सुरू असलेला “मोबाईल जुगार” बनला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या युवकांना, मजुरांना आणि सामान्य नागरिकांना थांबवून “एकदा ट्राय करा” असे सांगत पैसे उकळले जात आहेत.

अनेकजण सहज पैसे मिळण्याच्या लालसेपोटी या जाळ्यात अडकत असून, काही वेळातच त्यांची फसवणूक होत असल्याची चर्चा परिसरात आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, शहरातील महत्त्वाच्या चौकात इतका मोठा अवैध प्रकार सुरू असताना पोलिस प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप होत आहे. कायदा व सुव्यवस्थेचे धडे देणारे अधिकारी आणि अवैध धंद्यांवर कारवाईचे दावे करणारे प्रशासन प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

शहरात लहानसहान कारणांवर सामान्य नागरिकांवर कारवाई करणारे पोलिस, हेल्मेट तपासणीसाठी चौकाचौकात उभे राहणारे कर्मचारी आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणारे अधिकारी यांना हा उघडपणे सुरू असलेला जुगाराचा प्रकार दिसत नाही का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, अशा प्रकारांमुळे युवकांमध्ये जुगाराची सवय वाढत असून, गुन्हेगारी प्रवृत्तींनाही खतपाणी मिळत आहे.

काही रुपयांच्या मोहापायी अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडतात. तरीदेखील प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास भविष्यात शहरात अशा अवैध प्रकारांचे जाळे आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता अकोला पोलिस प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणार का, की नेहमीप्रमाणे काही दिवस दुर्लक्ष करून हा प्रकार पुन्हा सुरू राहणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!