Join WhatsApp group

Ads

-

वंचित बहुजन आघाडीत जुने कार्यकर्ते डावलल्याचा आरोप, मुर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

By Sarkarmzanews

January 4, 2026 11:14 am

Ads

मुर्तिजापूर : दिनांक ०४ : मुर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने प्रत्यक्ष पक्षासाठी काम करणाऱ्या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नवख्या व बाहेरून आलेल्या उमेदवारांना टिकिट दिल्याचा गंभीर आरोप भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष अंतगत (ताराचंद) बोरकर यांनी केला आहे.

बोरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नी सौ. आरती अंतगत बोरकर या वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या माजी शहर सचिव असून त्यांनी पक्षासाठी सातत्याने सामाजिक व राजकीय कार्य केले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार, घंटानाद आंदोलन, SDM कार्यालयात निवेदन, घरोघरी जाऊन प्रचार, बॅनर-पोस्टर, पॅम्पलेट वाटप, धम्मदान, बुद्ध विहारात प्रवचन मालिका, संडे धम्म स्कूल यासारख्या उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

असे असतानाही, SC राखीव असलेल्या प्रभाग क्र. १ मध्ये सौ. आरती बोरकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली, ही बाब पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, प्रभाग क्र. १ व १० मध्ये एकाच प्रभागात वेगवेगळ्या वेळेत दोन AB फॉर्म देण्यात आल्याचा, प्रभाग क्र. ६ मध्ये ठेकेदार खंडारे यांचे टिकिट कापल्याचा, तर काही प्रभागात जिल्हा परिषद व नगर परिषद अशा दोन्ही ठिकाणी संधी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

प्रभाग क्र. ५ व ७ मध्ये नवख्या उमेदवारांना संधी देऊन जुने कार्यकर्ते डावलण्यात आल्याने पक्षात तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, MIM मधून आलेल्या उमेदवारांना आधी टिकिट देऊन नंतर आजीवन सदस्यत्व देण्यात आल्याचे रहस्य काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या तालुका व जिल्हा कोर कमिटीने लेखी खुलासा करावा, अन्यथा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा बोरकर यांनी दिला आहे.

या प्रकरणामुळे मुर्तिजापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, वंचित बहुजन आघाडी नेतृत्व यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!