Join WhatsApp group

Ads

फरार असलेला चेतन महाराज उर्फ गुलालशेश भोंदू बाबाला अखेर अमरावतीतून अटक : एक दिवसाची पोलिस कोठडी

By Sarkar Maza

April 24, 2026 5:41 pm

Ads

मूर्तिजापूर: अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावात अंधश्रद्धेचा कळस गाठणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी अखेर संबंधित भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या आहेत.

चेतन मुळे उर्फ गुलालशेश असे या कथित भोंदू बाबाचे नाव असून, तो गेल्या काही दिवसांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला अमरावती येथून अटक करण्यात यश मिळवले.काही दिवसांपूर्वी सरकार माझा न्यूजने या भोंदूबाबाची पोलखोल केली होती.

या बातमी मध्ये संबंधित बाबा दरबार भरवत आजारी लहान मुलांना आपल्या दातात पकडून उपचार करत असल्याचा थरारक प्रकार समोर आला होता. या अमानुष आणि जीवघेण्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

या प्रकरणी तक्रार दाखल होताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी चेतन मुळे फरार झाला होता. पोलिसांनी शोधमोहीम राबवत अखेर त्याला अमरावती येथून ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला मूर्तिजापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या दरम्यान पोलिसांकडून अधिक सखोल चौकशी केली जाणार असून, या प्रकारामागील इतर कोणते रॅकेट किंवा सहकारी आहेत का याचाही तपास होणार आहे.दरम्यान, राज्यात सध्या भोंदू बाबांचा सुळसुळाट वाढताना दिसत आहे. दैवी शक्तीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असून, अशा प्रकारांमुळे निरपराध नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.

निंबा गावातील ही घटना त्याचाच एक गंभीर नमुना ठरली आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अशा भोंदूगिरीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!