Join WhatsApp group

Ads

--

मुर्तीजापुरात सकाळी भीषण आगीचे तांडव; पाणीपुरी विक्रेत्या योगेश निंबेकर यांचा संसार क्षणात राख, लाखोंचे नुकसान – कुटुंब उघड्यावर

By Sarkarmzanews

February 11, 2026 7:18 pm

Ads

मुर्तीजापुर : दिनांक ११ : शहरातील केसरीनंदन कॉलनी, सिरसो रोड परिसरात आज बुधवारी (दि. ११ फेब्रुवारी २०२६) सकाळी सुमारे ८.३० ते ९ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागून एका गरीब कुटुंबाचे संसाराचे घर अक्षरशः राख झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुमारे २ ते ३ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

माहितीनुसार, योगेश निंबेकर हे पाणीपुरीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते केसरीनंदन कॉलनीतील घराच्या वरच्या मजल्यावर कुटुंबासह वास्तव्यास आहेत. आज सकाळी अंदाजे ८ वाजताच्या सुमारास ते आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी बाहेर गेले होते. काही वेळाने घरी परत येताच त्यांच्या घराजवळ नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. घरातून धुराचे लोट व ज्वाळा उसळताना पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

आग इतकी भीषण होती की घरातील फ्रिज, टीव्ही, कुलर, सोफा, दिवाण, संगणक, लाकडी आलमारी, कपडे तसेच महत्त्वाची कागदपत्रे आणि सुमारे २५ हजार रुपयांची रोकड जळून खाक झाली. काही मिनिटांतच संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. हे दृश्य पाहून योगेश निंबेकर यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांनी तत्काळ पटवारी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. तसेच सिरसो ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सदस्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अग्निशमन दलाला संपर्क साधण्यात आला; मात्र गाडी वेळेत न पोहोचल्याने स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत पाणी व इतर साधनांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

या आगीत एका कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला असून, शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह पीडित कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!