Join Whatsapp

हरभऱ्या वरील घाटे अळीचे व्यवस्थापन कसे करावे

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क : दिनांक ०१ डिसेंबर : घाटे अळी हि अळी हरभऱ्याप्रमाणेच कापूस, ज्वारी, मका, तूर, टमाटे आणि इतर कडधान्य पिकांवर आढळून येते. परंतु हरभरा हे तिचे आवडते खाद्य असल्याने तिला घाटे अळी म्हणून ओळखले जाते. या किडीचा जीवनकाळ अंडी, अळी, कोष व पतंग अशा चार अवस्थेतून पूर्ण होतो. अळी अवस्था पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. पतंग मजबूत बांध्याचे, फिक्कट पिवळ्या रंगाचे व पंखावर एक कला ठिपका असलेले असतो. मागील पंखाच्या कडा धुरकट असतात.

नर व मादी पतंगाच्या मिलनानंतर मादी पतंग 3 ते 4 दिवसात पिकाच्या पानाफुलावर अथवा कोवळ्या शेंड्यावर 150 ते 300 गोलाकार चकचकीत हिरवट पिवळसर रंगाची अंडी घालतात. अंड्यातून 6 ते 7 दिवसात भुरकट पांढऱ्या अळ्या बाहेर येतात. सुरुवातीच्या काळात अळ्या पानांच्या खालच्या बाजूस राहून पाने कुरतडून खातात. त्यामुळे पानांवर पांढरे डाग आढळून येतात. या काळातील नुकसान चटकन लक्षात येत नाही. कळ्या व फुले लागल्यानंतर अळ्या ते खातात. घाटे लागल्यानंतर अळी डोक्याकडील अर्धा भाग घाट्यात खुपसून आतील दाणे खाते. त्यामुळे घाट्यावर गोलाकार छिद्रे दिसुन येतात. अळीची पूर्ण वाढ 15 ते 20 दिवसात 5 ते 6 वेळा कात टाकून पूर्ण होते.

पूर्ण वाढलेली अळी 4 ते 5 सेमी लांब व गडद हिरव्या किंवा तपकिरी करड्या रंगाची असते आणि तिच्या शरीराच्या दोन्ही बाजूस करड्या अथवा पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. एक अळी पूर्ण वाढ अवस्थेत 30 ते 40 घाटे अथवा 6 ते 8 ग्रॅम दाणे खाते. अळीपासून पिकाचे साधारणत: 30 ते 40 टक्के नुकसान होते. कोषावस्थेत जाण्यापूर्वी अळीची 1 ते 2 दिवस भूक मंदावते व अळी झाडाच्या अवती भोवती जमिनीत 5 ते 10 सेमी खोल जाऊन अंगाभोवती मातीचे वेष्टण करून त्यामध्ये कोषावस्थेत जाते. कोष तांबड्या रंगाचे असून 1.5 ते 2 सेमी लांब असतात. हवामानानुसार कोषावस्था 8 ते 15 दिवसात पूर्ण होते. कोषातून परत रात्रीचे वेळी पतंग बाहेर पडतात आणि त्यांचे पुढील प्रजनन सुरु होते. अशाप्रकारे या किडीचा जीवनक्रम 30 ते 40 दिवसात पूर्ण होतो.

कीडव्यवस्थापन:

हरभरा पिकाचे या किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे व त्या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.

हरभरा पिक एक महिन्याचे होईपर्यंत निंदणी आणि कोळपणी करून तण विरहीत ठेवावे.

कीड नियंत्रणाची वेळ निश्चित करण्यासाठी आठवड्यातून एक दोन वेळेस पिकाची बारकाईने पाहणी करून पानांवर बारीक बारीक पांढरे डाग दिसून येताच अथवा पिकाच्या एक मीटर लांब ओळीत 1-2 अळ्या आढळून आल्यास अथवा 5 टक्के घाट्यावर अळीचा उपद्रव दिसून येताच एक हेक्टर क्षेत्रात 8-10 फेरोमोन (कामगंध) सापळे बांबूच्या सहाय्याने पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंचीवर अडकवून सलग 2 ते 3 दिवस प्रत्येक सापळ्यात 8-10 पतंग येत असल्यास कीटकनाशाकाची फवारणी/धुरळणी करावी.

पिक फुलोऱ्यात आणि घाटे भरताना अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास शक्य झाल्यास अळ्या वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.

पेरणी बरोबर ज्वारीची दाणे मिसळली नसल्यास शेतात पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंच इंग्रजी (T) आकाराच्या काठ्या पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षीथांबे म्हणून रोवाव्यात.

रासायनिक कीटकनाशाकांची फवारणी/धुरळणी शक्यतो पट्टा पद्धतीने पिकाच्या 1 ते 1.5 मी. रुंद एका आड एक पट्ट्यावर करावी व राहिलेल्या पट्ट्यावर 5-7 दिवसांनी परत फवारणी करावी जेणेकरून परोपजिवी/परभक्षी किडींचे संवर्धन होऊन त्यांची कीड नियंत्रणास मदत होईल.

घाटे अळीच्या नियंत्रणाकरिता त्या अळीचा विषाणू (एच.ए.एन.पी.व्ही.) प्रती हेक्टर 500 रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा.

स्रोत- कृषी जागरण


Share

Leave a Comment

error: Content is protected !!