Join WhatsApp group

Ads

---

चोरांचा करंट वाढला! शेतकऱ्यांची वीज पळवून टोळी पसार

By Sarkar Maza

June 19, 2026 9:58 pm

Ads

मुर्तिजापूर तालुक्यातील शेलू शिवारात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत थेट विद्युत वितरण कंपनीच्या लाईनवरच डल्ला मारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत विद्युत लाईनचे लोखंडी पोल कापून त्यावरील तारा चोरी करून नेल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 18 जूनच्या मध्यरात्री शेलू शिवारातील अशोक सातींग, अनिल देशमुख, पांडुरंग गाडवे आणि संतोष बोडे यांच्या शेताकडे जाणाऱ्या विद्युत लाईनवर चोरट्यांनी हात साफ केला. विशेष म्हणजे, केवळ तारा चोरी न करता चोरट्यांनी थेट लोखंडी पोलच कापून टाकल्याने या टोळीचे धाडस आणि नियोजन स्पष्ट होत आहे.


सध्या पावसाळा सुरू असून शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. अशा महत्त्वाच्या काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास सिंचनासह शेतीची अनेक कामे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आधीच नैसर्गिक संकटांशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता चोरीचे नवीन संकट उभे राहिले आहे.


या प्रकारानंतर गजानन मोरे, अशोक सातींग, अनिल देशमुख, देविदास गायकवाड, संतोष बोडे, मनोहर अवघाट, पांडुरंग गाडवे, अमोल पराडे, अभय पावडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपअभियंत्यांकडे तक्रार दाखल करून तातडीने नवीन पोल व तारा बसविण्याची मागणी केली आहे.


स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, “विद्युत पोल कापून तारा चोरी करणे ही साधी चोरी नसून यामागे सराईत टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही परिसरात अशा घटना घडल्या असल्याची चर्चा आहे.”


दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने पंचनामा करून वीजपुरवठा पूर्ववत करावा, तसेच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!