Join WhatsApp group

Ads

अकोला पीक विमा प्रकरणाची होणार सखोल चौकशी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रशासनाला निर्देश

By Sarkar Maza

June 10, 2026 4:22 pm

Ads

अकोला जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगाम २०२३-२४ तसेच खरीप हंगाम २०२४-२५ मधील पीक विमा भरपाई संदर्भातील तक्रारींची गंभीर दखल घेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला सखोल चौकशीचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकींचे इतिवृत्त आणि जिल्हाधिकाऱ्यांचा सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंत्रालयात आयोजित बैठकीत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एचडीएफसी इरगो इन्श्युरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस कामगार मंत्री आकाश फुंडकर, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार हरीष पिंपळे, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे), कृषी संचालक विनयकुमार आवटे, अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी बाळासाहेब गोपाळ तसेच भारतीय किसान संघाचे प्रांत उपाध्यक्ष राहुल राठी उपस्थित होते.

बैठकीत कृषीमंत्री भरणे यांनी खरीप व रब्बी हंगाम २०२३-२४ आणि खरीप हंगाम २०२४-२५ मधील पीक विमा भरपाई प्रक्रियेतील त्रुटी, शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि विमा कंपनीच्या कार्यपद्धतीची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले.

त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीत विमा कंपन्यांच्या तांत्रिक अडचणींचा फटका शेतकऱ्यांना बसू नये आणि मदतीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये.यासोबतच, या प्रकरणी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी आतापर्यंत घेतलेल्या सर्व बैठकींचे इतिवृत्त शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाहीही कृषीमंत्री भरणे यांनी दिली.पीक विमा भरपाईच्या प्रश्नावर शासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या असून, आता चौकशी अहवालानंतर पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!