Join WhatsApp group

स्पेस स्टेशनला जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण? ते तिथे कोणत्या प्रयोगात सहभागी होतील?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

वकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होते – राकेश शर्मा.

तब्बल 40 वर्षांनी भारताचे दुसरे अंतराळवीर ठरतील – ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. पण ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत. शुभांशु शुक्ला ज्या मोहीमेचा भाग आहेत ती Axiom – 4 (Ax-4) मोहीम अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज आहे.

अ‍ॅक्सिओम 4 मोहीम काय आहे? यामध्ये शुभांशु शुक्ला यांच्यासोबत कोण कोण असेल? आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जाऊन ते कोणते प्रयोग करणार आहेत?

अ‍ॅक्सिओम 4 मोहीम

Axiom – 4 ही मोहीम राबवण्यात येतेय Axiom Space या खासगी स्पेसफ्लाईट कंपनीद्वारे. त्यांनी या मोहिमेसाठी नासा, इस्रो, युरोपियन स्पेस एजन्सी या अंतराळसंस्थांसोबत भागीदारी केली आहे.

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे Axiom – 4 मिशनचे पायलट असतील. नासाच्या फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस सेंटरमधून ही मोहीम झेपावेल. यासाठी स्पेस एक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टचा वापर केला जाईल आणि ही मोहीम 14 दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल.

नासाच्या अंतराळवीर पेगी व्हिटसन या मिशनच्या कमांडर असतील. युरोपीयन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर स्टावोझ युझनान्स्की विझन्युस्की (Sławosz Uznański-Wiśniewski) हे पोलंडचे आहेत. तर तिसरे अंतराळवीर टिबोर कापू हे हंगेरीचे आहेत.

शुभांशु शुक्ला आणि या मोहिमेतले इतर अंतराळवीर आता क्वारंटाईन झालेयत. 25 मे ला अॅक्सिओम स्पेसच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सेंड ऑफ दिला. अंतराळवीरांना लाँचच्या अगदी आधी कोणताही संसर्ग होऊ नये, त्याचा मोहिमेवर परिणाम होऊ नये, यासाठी लाँचच्या दिवसापर्यंत क्रू क्वारंटाईन राहतो.

शुभांशु शुक्ला कोण आहेत?

शुभांशु शुक्ला भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आहेत. अमेरिकेची नासा (NASA)आणि भारताची इस्रो (ISRO) या जगातील दोन आघाडीच्या अंतराळ संस्थांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी त्यांची निवड झाली आहे. 1985 साली जन्मलेले शुक्ला हे उत्तर प्रदेशातल्या लखनौचे रहिवासी आहेत. 2006 मध्ये ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले आणि त्यांना 2000 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. भारतीय वायुसेनेत असणाऱ्या सुखोई-30 MKI, मिग-21S, मिग-29 S, जॅग्वार, हॉक्स डॉर्नियर्स आणि N-32 सारखी लढाऊ विमानं चालवण्याचा अनुभव शुक्लांच्या गाठीशी आहे.

इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांपैकी शुक्ला एक आहेत. या Ax-4 मोहिमेत त्यांच्यासोबत इतर 3 अंतराळवीर असतील.

अ‍ॅक्सिओम 4 मोहीम काय करेल?

या मोहिमेत अंतराळात 60 वैज्ञानिक अभ्यास आणि प्रक्रिया केल्या जातील. रंजक बाब म्हणजे जगातल्या 31 देशांनी या गोष्टी सुचवल्या आहेत. यामध्ये अमेरिका, भारत, पोलंड, हंगेरी, सौदी अरेबिया, ब्राझील, नायजेरिया, UAE आणि युरोपातल्या देशांचा समावेश आहे. म्हणून या अवकाश मोहिमेला एक जागतिक महत्त्व आहे. Low Earth Orbit म्हणजे पृथ्वीच्या खालच्या कक्षेमधल्या मायक्रोग्रॅव्हिटीचा अभ्यास करणं या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट आहे.

अंतराळातलं आयुष्य, त्याचा लहान जीव – झाडं आणि मानवी शरीरावर होणारा परिणाम याचा अभ्यास या मोहिमेत केला जाईल. शिवाय अंतराळामध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानात करण्याच्या सुधारणा, स्पेस फूडसाठी Microalgae उगवणं, सॅलड उगवणं, सूर्यप्रकाशावर वाढणाऱ्या आणि ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या Cyanobacteria चा अभ्यास या मोहिमेदरम्यान अंतराळवीर करतील.

या स्पेस मिशनचा फायदा भारत, पोलंड आणि हंगेरी या तीनही देशांना त्यांच्या अंतराळ कार्यक्रमासाठी होणार होईल.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!