Join WhatsApp group

हजारो किलोमीटरचा प्रवास पार करत कुरणखेड येथील ‘धागा शौर्य का राखी’ अभियान सीमेवर 🇮🇳

Photo of author

By Sarkarmzanews

Share

कुरणखेड – भारताच्या सीमेवर तैनात आपल्या जवानांप्रती कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कुरणखेड गावात ‘धागा शौर्य’ राखी अभियानाचे आयोजन करण्यात आले. वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथक व स्थानिक महिला स्वयंसहायता बचत गट यांच्या पुढाकाराने हे अभियान राबवण्यात आले.

गेल्या दहा दिवसांपासून गावात घराघरांतून राखी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. गावकऱ्यांच्या उत्साही प्रतिसादामुळे प्रत्येक घरातून सैनिक बांधवांसाठी राखी जमा झाली.

हा उपक्रम १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त गजानन महाराज विद्यालयात संपन्न झाला. यंदा गावचे सुपुत्र, वीर जवान नितेश घाटे यांच्या अलीकडील वीरमरणा मुळे हा कार्यक्रम कोणतेही औपचारिक प्रमुख पाहुणे न ठेवता साध्या पद्धतीने पार पडला. सुरुवातीला शहीद नितेश घाटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

महिलांनी जमा केलेल्या राख्या गावातील मान्यवरांच्या हस्ते स्थानिक पोस्ट अधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थी उपस्थित होते. महिला स्वयंसहायता बचत गटांच्या सदस्यांसोबत गजानन महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित नागरिक अनंतराव बाळासाहेब देशमुख होते. तर मंचावर पोलीस निरीक्षक अनिल गोपाल (बोरगाव मंजू पोलीस स्टेशन), समाजसेविका कमलजीत कौर, माजी जिल्हा परिषद सदस्य छायाताई देशमुख, विद्यालयाचे मुख्याध्यापक रंजित सोळंके, प्रशांत ठाकरे आणि युवा समाजसेवक केल्विन सुबी उपस्थित होते.

प्रास्ताविक ‘धागा शौर्य’ अभियान संयोजक योगेश विजयकर यांनी केले. आभार गिरधर भोंडे यांनी मानले. आयोजन यशस्वी करण्यासाठी शिवशक्ती महिला ग्रुप, शिवशक्ती, सावित्रीबाई फुले, बालाजी, जिजाऊ, समर्थ, गुरुकृपा, साईराम, महालक्ष्मी, कल्पवृक्ष, राधाकृष्ण, एकता, जय श्रीराम, चंडिका माता, प्रगती महिला बचत गटांसह अनेक महिला गटांनी मोलाचे योगदान दिले.

हजारो किलोमीटर प्रवास करून भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष कटरा आणि अतिसंवेदनशील पहेलगाम सीमेवरील ठिकाणी राखी सैनिक बांधवांना सुपूर्त करण्यात आली. गावातील महिलांनी व मुलींनी मोठ्या उत्साहाने जमा केलेल्या राख्या सैनिकांच्या मनापर्यंत पोहोचल्या, याचा आनंद गावभर साजरा करण्यात आला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!