Join WhatsApp group

दिवाळीच्या रात्री महामार्गावर दुःखद अपघात — पैलपाडा जवळ 3 ठार, 1 जखमी , बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत भीषण घटना, मृतांमध्ये दांपत्याचा समावेश

Photo of author

By Sarkarmzanews

Share

बोरगाव मंजू : दिवाळीच्या रात्री राष्ट्रीय राज्य महामार्गावर पैलपाडा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना मंगळवार, दि. 21 ऑक्टोबर रोजी रात्री अंदाजे 9.45 वाजताच्या सुमारास घडली.

मृतांमध्ये बोरगाव मंजू येथील धीरज सिरसाठ (वय अंदाजे 35), पत्नी अश्विनी सिरसाठ आणि आरिफ खान यांचा समावेश आहे, तर अन्वर खान हे किरकोळ जखमी झाले आहेत.
धीरज आणि अश्विनी सिरसाठ हे नाश्ता व चायनीज गाडीचा व्यवसाय करत होते. मंगळवारी ते कारंजा तालुक्यातील खेर्डा येथून आपले काम आटोपून स्वतःच्या चारचाकी गाडीने (क्र. MH 30 AB 2006) बोरगाव मंजूकडे परतत होते.

कुरणखेडजवळ त्यांच्या गाडीमध्ये अचानक बिघाड झाला. त्या ठिकाणी बोरगाव मंजू येथीलच एका मालवाहतूक गाडीच्या मदतीने त्यांनी आपली कार टोचन करून नेली. परंतु पैलपाडा व कुरणखेड यांच्या दरम्यान महामार्गावर दोन्ही वाहने थांबली असता, त्यांनी गाडीचा टायर पाहण्यासाठी खाली उतरताच, भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने चौघांनाही जोराची धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की धीरज व अश्विनी सिरसाठ हे दांपत्य तसेच आरिफ खान हे तिघे जागीच ठार झाले, तर अन्वर खान हे जखमी अवस्थेत पडले.

बचाव कार्य व पोलिसांची तत्परता

अपघाताची माहिती मिळताच कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी अन्वर खान यांना ॲम्बुलन्सद्वारे मुर्तीजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, पोलीस निरीक्षक अनिल गोपाल, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, धुळे, सचिन सोनटक्के, नारायण शिंदे व पातोंड यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक लॅबची गाडीही घटनास्थळी दाखल झाली असून, पुराव्यांचे संकलन व तपास सुरू आहे.

वाहतुकीवर परिणाम

एका स्पॉटवर तीन मृतदेह पडलेले असल्याने महामार्गावरील वाहतूक काही तासासाठी एकतर्फी करण्यात आली होती. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागले.

सणाच्या दिवशीही बचावकार्य थांबले नाही

दिवाळीच्या सणाच्या रात्रीदेखील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख योगेश विजयकर, विजय माल्टे, मोहन वाघमारे, शुभम कातखेडे, शाहबाज शहा, सैय्यद माजिद आणि अक्षय मोरे यांनी अपघातस्थळी मदतकार्य केले. त्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवले तसेच मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी सहकार्य केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!