Join WhatsApp group

मुर्तिजापूर तालुक्यात वाळू माफियांचा सुळसुळाट रात्रीच्या अंधाराचा व थंडीचा फायदा घेत या अवैध धंद्याला चालना

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : दिनांक ०८ : मुर्तिजापूर तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि साठेबाजार पुन्हा डोके वर काढत असून नदीकाठच्या परिसरात रात्रीच्या अंधाराचा व थंडीचा फायदा घेत वाळू माफियांची हालचाल वाढल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. विशेषतः सोनोरी परिसर हे वाळू जमा करण्याचे केंद्रबिंदू बनले असून येथे ट्रॅक्टर, ट्रॉली आणि मजूरांची हालचाल रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

काही दलाल रातोरात मोठ्या प्रमाणात साठा करून तो वाळू माफियांना पुरवतात, अशीही माहिती समोर आली आहे. नदीकाठावरील अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतोय, तर दुसरीकडे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसतो आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, उपविभागीय अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. रात्रीची थंडी आणि अंधार यांचा फायदा घेऊन हा सर्व धंदा बेधडक सुरू असताना संबंधित विभाग मात्र याबाबत मौन पाळत असल्याची चर्चा आहे.

अवैध उत्खननामुळे नदीपात्राची खोली वाढून परिसरातील शेती, विहिरी आणि पाणीपातळीवर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाने तात्काळ कारवाई करून हा अवैध व्यवसाय थांबवावा, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!