Join WhatsApp group

पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अहिल्यानगर दि.०३ :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ६७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजतेपद पटकाविले. स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. राज्यातील क्रीडा विकासाला चालना देताना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.पवार यांनी दिली.

मॅट विभागात नांदेडचा (मूळचा पुण्याच्या राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा) डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. यात पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. माती विभागातून सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांच्यात अंतिम लढत झाली. यात महेंद्र गायकवाड विजेता ठरला.

अहिल्यानगर येथील वाडिया पार्कमध्ये कै.बलभिम अण्णा जगताप क्रीडानगरीत  झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संग्राम जगताप, माऊली खटके, काशिनाथ दाते,  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.रामदास तडस, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यातील क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी पारितोषिकेही  मोठी ठेवण्यात आली आहेत. गेले पाच दिवस स्पर्धेच्या भव्य आयोजनाचा आनंद राज्याच्या जनतेला घेता आला. यापुढेदेखील या स्पर्धेचे आयोजन करतांना या स्पर्धेचे दिमाखदार आयोजनाचे आव्हान आयोजकांसमोर असेल. खेळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनदेखील प्रयत्नशील आहे.  प्रत्येक खेळाच्या विकासासाठी राज्य शासन सहकार्य करेल आणि अहिल्यानगरच्या क्रीडा विकासासाठीदेखील आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे भव्य आयोजन झाल्याचे नमूद करून केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, ही मानाची स्पर्धा आहे. स्व.मामासाहेब मोहोळ यांनी या स्पर्धेला सुरूवात केली. त्यानंतर राज्यात कुस्तीच्या वैभवात भर पडून ही परंपरा आणखी पुढे जात आहे. महाराष्ट्र कुस्तीची पंढरी आहे. राज्याने देशाला अनेक मल्ल दिले. महाराष्ट्राच्या तीन मल्लांना शासनाने वर्ग एक दर्जाच्या पदावर नियुक्ती दिली आहे.  येत्या काळातही कुस्तीला राजाश्रय मिळेल असा विश्वास व्यक्त करून राज्याची ही परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुस्ती खेळाला डोपींगसारख्या प्रकाराने गालबोट लागू नये यासाठी  येत्या काळात अधिक प्रयत्न होतील असे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेचे सभापती प्रा.शिंदे  यांनी जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल राज्य शासन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला धन्यवाद दिले. कुस्तीप्रेमी जनता चांगल्या खेळालाच प्रोत्साहन देते असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगर वासियांसाठी मोठी पर्वणी आहे. वाडिया पार्कचे मोठ्या स्टेडिअममध्ये रुपांतर करायचे आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला चालना मिळेल असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबद्दल संयोजकांचे अभिनंदन करून क्रीडा मंत्री भरणे म्हणाले, २००५ मध्ये अहिल्यानगरमध्ये ‘हिंद केसरी’ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. राज्याला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याने मल्ल दिले आहेत. अहिल्यानगरच्या क्रीडा विकासासाठी शासनाकडून आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविकात आमदार जगताप यांनी कुस्ती स्पर्धेविषयी माहिती दिली. लाल मातीच्या खेळातून संस्कार होत असल्याने राज्यभरात या खेळाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या कुस्ती स्पर्धेमुळे  अहिल्यानगरचे नाव प्राधान्याने घेतले जाईल असे ते म्हणाले.

माजी आमदार अरुण जगताप, पद्मश्री पोपट पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी खासदार सुजय विखे पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंदकेसरी पै. योगेश दोडके, चित्रपट दिग्दर्शक प्रविण तरडे,   जिल्हा कुस्तीगीर कार्याध्यक्ष संघाचे संतोष भुजबळ आदी उपस्थित होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!