Join WhatsApp group

मुर्तिजापूर नगर परिषद निवडणूक 2025 : राजकीय गडुळ वातावरण साफ … शहरात पुन्हा दिसतेय प्रेमळ संस्कृती

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : दिनांक ०७ : नगर परिषद निवडणुकीचा ताप शांत होत असताना, शहरातील राजकीय गडुळ वातावरण हळूहळू स्वच्छ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. प्रभागनिहाय हालचाली, पक्षांतर, नाराजी, गटबाजी, गुप्त सौदेबाजी यामुळे मागील काही दिवसांपासून शहरातील वातावरण तापले होते. मात्र आता त्याच शहरात चौकातल्या टपऱ्यांवर गप्पांचा फड रंगताना, चहापाणीसोबत सहजपणे निवडणुकीवर चर्चा होताना दिसू लागली आहे.

काही भागात तर विरोधकही एकाच टेबलावर सामोरा–सामोर बसून निवडणुकीच्या समीकरणांची चर्चा करताना दिसत आहेत. संध्याकाळी काहींनी बारमध्येही राजकीय ‘मीटिंग’चे सोहळे रंगवताना शहरातील जुनी मैत्री आणि आपुलकीचा वारसा पुन्हा एकदा जाणवू लागला आहे. कट्टर विरोधक निवडणुकीच्या मैदानात जरी आमनेसामने असले, तरी वैयक्तिक नात्यात मुर्तिजापूरची सौहार्दपूर्ण संस्कृती कायम असल्याचे हे चित्र स्पष्ट करते.

दरम्यान, कोणत्या पक्षातील कोणत्या नेत्याने कुणाच्या पाठीमागून ‘गद्दारी’ केली, कोण कुणाला झुकतं माप देतोय, कोणत्या प्रभागात ‘हाताखाली’ सौदेबाजी झाली… या सगळ्याची उघडपणे चर्चा नागरिक करताना दिसत आहेत. काही जुने राजकीय ‘नारदमुनी’ आजही शहरात सक्रीय असून तेच वक्तशीरपणे एकीकडच्या गोष्टी दुसरीकडे आणि दुसरीकडच्या गोष्टी तिसरीकडे पोहोचवत आहेत. त्यामुळे शहरातील रंगतदार राजकीय गॉसिपचा माहोल आणखी तापलेला आहे.

निवडणूक संपल्यानंतर वातावरणातील बदल—
• गटांचे ताणतणाव कमी झाले
• चौकातल्या राजकीय चर्चांना मैत्री पूर्ण रंग चढले
• विरोधकांमध्येही मैत्रीपूर्ण संवाद वाढले
• शहरातील सौहार्द पुन्हा दिसू लागले

…या सर्वांमधून मुर्तिजापूरची ओळख असलेली प्रेमळ व आपुलकीची संस्कृती पुन्हा आपल्या मूळ रुपात येत असल्याचे स्पष्ट होते.

नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली, तरी शहरातील नागरिकांचा स्वभाव, संवादाची परंपरा आणि राजकीय मैत्रीचे अनोखे मिश्रण यामुळे मुर्तिजापूरचे राजकारण अजूनही खास आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!