Join WhatsApp group

धर्मादाय रुग्णालयांवरील मनमानीवर आळा आणण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांची विधानसभेत ठोस मागणी; शासनाची सविस्तर कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १ जुलै २५ : मुंबई : राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब व गरजू रुग्णांना सवलतीत उपचार मिळावेत यासाठी शासनाने नियमावली आखून दिली असली तरी काही रुग्णालयांकडून मनमानी वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रणधीर सावरकर यांनी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न क्रमांक 7085 अन्वये शासनाचे लक्ष वेधले.

त्यांनी आपल्या प्रश्नात, पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या ईश्वरी (तनिष्का) भिसे यांना 10 लाख रुपये अनामत भरता न आल्यामुळे उपचार न मिळाल्याने मृत्यू ओढवला, अशी गंभीर बाब उपस्थित केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाच्या वतीने सविस्तर उत्तर देत शासनाची भूमिका स्पष्ट केली.

शासनाच्या उत्तरात नमूद करण्यात आले की, सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने दिलेल्या अहवालानुसार संबंधित डॉक्टर डॉ. घैसास यांनी इंडियन मेडिकल कौन्सिलच्या 2022 मधील नियम 1.8 चे उल्लंघन केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

तसेच, संबंधित रुग्णालयाकडे निर्धन रुग्ण निधीत 34 कोटींहून अधिक रक्कम शिल्लक असूनही गरजू रुग्णाला मदत न मिळणे, हे गंभीर असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. याप्रकरणी रुग्णालयाच्या विश्वस्तांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, 1950 अंतर्गत कलम 41 अअ व 66ख अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.

शासनाने या प्रकरणातील नवजात बालिकांच्या नावावर प्रत्येकी 5 लाखांची मुदत ठेव देखील बँक ऑफ महाराष्ट्र, संगमवाडी शाखेत केली आहे. याशिवाय, धर्मादाय रुग्णालयांची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध व्हावी यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड तयार करण्यात आलेला असून, खाटांची माहिती, मदत कक्ष, व तपासणी समिती स्थापन करण्याचे निर्देश शासनाने 10 जून 2025 रोजी दिले आहेत.

धर्मादाय रुग्णालयातील 186 आरोग्य सेवकांच्या भरतीबाबतही GEM पोर्टलवर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा विधी व न्यायमंत्री यांच्या कार्यालयाच्या अधीन धर्मादाय मदत कक्ष स्थापन करून गरजूंना तातडीने मदत उपलब्ध व्हावी, यासाठी कार्यवाही सुरू आहे.

शेवटी, धर्मादाय रुग्णालयांमधील मनमानीवर आळा घालण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्तक्षेपामुळे गंभीर प्रकरणांवर शासनाने लक्ष घालून कारवाई सुरू केली असून, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी यंत्रणा अधिक बळकट केली जाणार आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!