Join WhatsApp group

विजेच्या धक्क्याने अल्पवयीन कामगाराचा मृत्यू – बांधकाम स्थळी भीषण अपघात

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला– दिनांक १३ ऑगस्ट २५ – अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वडगाव रोठे येथे १२ ऑगस्ट मंगळवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता बांधकामस्थळी घडलेल्या भीषण दुर्घटनेत एका अल्पवयीन कामगाराचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

वसंता बरिंगे यांच्या घरावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. सेंट्रिंगचे काम करणारे १४ ते १५ तरुण तेथे कार्यरत होते. बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी (ता. संग्रामपूर) येथील १७ वर्षीय ओमप्रकाश केशवराव जांभळे हा कामगार इतर मजुरांसोबत या कामासाठी आला होता.

स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मिक्सर मशीन बाजूला नेत असताना गाडीचा स्पर्श वरून जाणाऱ्या विद्युत तारेला झाला. यामुळे विद्युत प्रवाह संपूर्ण ठिकाणी पसरला आणि कामगारांना जोरदार शॉक बसला. काही कामगारांना तातडीने मिक्सरपासून दूर करण्यात आले, मात्र ओमप्रकाशकडे लक्ष न गेल्याने त्याला जोरदार विद्युत धक्का बसला. उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

या घटनेत आठ जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. सर्व जखमी कामगार हे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक तपासात सेंट्रिंगचा साचा उचलताना तो वीजवाहक तारेला लागल्याने अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, घटनेनंतर बांधकाम ठेकेदार घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अपुऱ्या सुरक्षात्मक उपायांमुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!