Join WhatsApp group

महाराष्ट्र – राज्य सरकारचा विशेष बातम्या – सरकार माझा न्युज सोबत

Photo of author

By Sarkarmzanews

Share

न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई, दि. २२ : तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.

राजभवन येथे मंगळवारी (दि. 21) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. आलोक आराधे यांना पदाची शपथ दिली.

शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्या. आराधे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते.

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी न्या. आलोक आराधे यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

न्या. आलोक आराधे यांचा जीवन परिचय

न्या. आलोक अराधे यांचा जन्म १३ एप्रिल १९६४ रोजी रायपूर, छत्तीसगड येथे झाला. त्यांनी १२ जुलै १९८८ रोजी वकील म्हणून नोंदणी केली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात त्यांनी नागरी आणि घटनात्मक प्रकरणांवर काम केले. एप्रिल २००७ मध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. २९ डिसेंबर २००९ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश व  १५ फेब्रुवारी २०११ रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. न्या. आराधे २० सप्टेंबर २०१६ रोजी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि ११ मे २०१८ रोजी हंगामी मुख्य न्यायमूर्ती झाले. १७ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती. ३ जुलै २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२२ त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात हंगामी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पहिले.  दिनांक १९ जुलै २०२३ रोजी त्यांची तेलंगाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली.

न्या. आलोक अराधे यांनी मध्यस्थी व सामंजस्य केंद्रे, न्यायिक अकादमी, तसेच कायदेशीर सेवा प्राधिकरणांमध्ये नेतृत्व केले आहे. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी न्यायव्यवस्थेच्या विविध अंगांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. २२ : राज्यामध्ये स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आर्थिक वर्ष 2025 – 26 च्या नियोजनासाठी आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. बैठकीस सचिव वीरेंद्र सिंग, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगे, राज्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, सहसंचालक श्रीमती कमलापुरे आदींसह विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य मंडळाच्या ठिकाणी संदर्भ सेवा रुग्णालये उभारण्याबाबत  पुढील वर्षात आर्थिक तरतुदीची मागणी करण्याबाबत सूचना देताना आरोग्य मंत्री श्री.अबिटकर म्हणाले, नाशिक व अमरावती येथील संदर्भ सेवा रुग्णालय कार्यान्वित झाली आहे. उर्वरित सर्व ठिकाणी रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागा शोधून निधीची मागणी करण्यात यावी. मागील आर्थिक वर्ष 2024 – 25 मध्ये मिळालेला संपूर्ण निधी खर्च करण्यात यावा. याबाबत विहित कालमर्यादा निश्चित करण्यात यावी. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. तसेच कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमही प्रभावीपणे राबविण्यात यावी.

जिल्हास्तरावर आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती तसेच तक्रारीच्या अनुषंगाने संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात यावी. यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची नियुक्ती करावी. या संपर्क यंत्रणेचे केंद्र मुंबईत असावे. महात्मा फुले जन आरोग्य अभियान अंतर्गत उपलब्ध खाटांची माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी मंत्री सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्याच्या धोरणाबाबत निर्णय लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २१ :- सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करणे, निर्वासित इनाम (नुकसान भरपाई आणि पुर्नवसन) याबाबत नवीन धोरण तयार करून याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात आयोजित बैठकीत दिली.

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करणे, निर्वासित इनाम (नुकसान भरपाई आणि पुर्नवसन) अधिनियम १९५४ नुसार मौजा, गांधी चौक, ता.वणी, जि.यवतमाळ येथील निर्वासित सिंधी समाजाच्या विस्थापितांना दिलेले वाणिज्य भुखंडाचे पट्टे नियमित करुन मालकी हक्क प्रदान करणे आणि  जरीपटका कॉलनी, नागपूर येथील अतिक्रमीत जागेसंदर्भात  महसूल मंत्री यांच्या समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव श्रीमती अश्विनी यमगर व संबधित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ४,९९,३२१ कोटींचे सामंजस्य करार

  • पहिला करार राज्यातील पहिला जिल्हा गडचिरोलीसाठी
  • बाहर बर्फ, लेकिन अंदर गरमी है, असे का म्हणाले सज्जन जिंदाल?
  • नागपूर, गडचिरोलीसाठी जेएसडब्ल्यूशी ३ लाख कोटींचा सामंजस्य करार
  • ९२,२३५ रोजगार निर्मिती

दावोस, २२ जानेवारी : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उद‌्घाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला असून, तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत याबद्दल जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदाल यांचे आभार मानले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. दावोसमध्ये बाहेर बर्फ पडतो आहे. पण, येथे आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्याने गर्मी आहे, असे सांगताना ते म्हणाले, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि तितकीच सहजसोपी प्रक्रिया आहे. गुंतवणूकदारांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही, असे मी त्यांना सांगितल्याचे सज्जन जिंदाल यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आज दावोसमध्ये पहिला करार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याप्रमाणे राज्यातील शेवटच्या नाही, तर पहिला जिल्हा असलेल्या गडचिरोलीसाठी झाला. कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. यात गुंतवणूक 5200 कोटी रुपयांची असून 4000 रोजगार निर्मिती होणार आहे. आज झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश असून, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.

फ्युएलची पुण्यात संस्था

यातील एक करार फ्युएल अर्थात फ्रेंडस युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज यांच्याशी करण्यात आला असून, ते महाराष्ट्रातील 5000 युवकांना आर्टिफिशियल इंटिलिजन्स, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षित करणार आहेत. फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी पुण्यात स्थापन करण्याचा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे…

(टीप : ही यादी भारतीय वेळेनुसार सायं. 8.30 पर्यंत)
आतापर्यंत झालेले सामंजस्य करार
एकूण : 4,99,321 कोटींचे

1) कल्याणी समूह
क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही
गुंतवणूक : 5200 कोटी
रोजगार : 4000
कोणत्या भागात : गडचिरोली

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 16,500 कोटी
रोजगार : 2450
कोणत्या भागात : रत्नागिरी

3) बालासोर अलॉय लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 17,000 कोटी
रोजगार : 3200

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 12,000 कोटी
रोजगार : 3500
कोणत्या भागात : पालघर

5) एबी इनबेव
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 750 कोटी
रोजगार : 35
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

6) जेएसडब्ल्यू समूह
क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स
गुंतवणूक : 3,00,000 कोटी
रोजगार : 10,000
कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली

7) वारी एनर्जी
क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे
गुंतवणूक : 30,000 कोटी
रोजगार : 7500
कोणत्या भागात : नागपूर

8) टेम्बो
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 1000 कोटी
रोजगार : 300
कोणत्या भागात : रायगड

9) एल माँट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 2000 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : पुणे

10) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 1000
कोणत्या भागात : एमएमआर

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी
क्षेत्र : डेटा सेंटर्स
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : एमएमआर

12) अवनी पॉवर बॅटरिज
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 10,521 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

13) जेन्सोल
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 4000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

14) बिसलरी इंटरनॅशनल
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 250 कोटी
रोजगार : 600
कोणत्या भागात : एमएमआर

15) एच टू ई पॉवर
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 10,750 कोटी
रोजगार : 1850
कोणत्या भागात : पुणे

16) झेड आर टू समूह
क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स
गुंतवणूक : 17,500 कोटी
रोजगार : 23,000

17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स
क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही
गुंतवणूक : 3500 कोटी
रोजगार : 4000
कोणत्या भागात : पुणे

18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 8000 कोटी
रोजगार : 2000

19) बुक माय शो
क्षेत्र : करमणूक
गुंतवणूक : 1700 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : एमएमआर

20) वेल्स्पून
क्षेत्र : लॉजिस्टीक
गुंतवणूक : 8500 कोटी
रोजगार : 17,300


Share

Leave a Comment

error: Content is protected !!