Join WhatsApp group

आंतरशालेय कुस्ती स्पर्धेला गालबोट – प्रशिक्षकावर व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : दिनांक १० ऑक्टोबर २५ : अकोला जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्र पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आंतरशालेय कुस्ती स्पर्धेदरम्यान चौदा वर्षीय विद्यार्थी कुस्तीपटूचे वजन करतानाच्या अवस्थेतील व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अकोट फाईल येथील रहिवासी व कुस्ती प्रशिक्षक कुणाल माधवे याच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आंतरशालेय कुस्ती स्पर्धेला गालबोट लागले आहे.

घटना अशी

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने ६ आणि ७ ऑक्टोबर २०२५ रोजी नीमवाडी येथील पोलीस हॉलमध्ये आंतरशालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध शाळांमधील कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेपूर्वी वजन करण्याच्या प्रक्रियेदरम्यान एक चौदा वर्षीय विद्यार्थी वस्त्रविहीन अवस्थेत असताना उपस्थित प्रशिक्षक कुणाल माधवे यांनी त्याचा व्हिडिओ चित्रीत केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, प्रशिक्षक माधवे यांनी केवळ व्हिडिओ शूटच केला नाही तर अर्वाच्य भाषेत बोलून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. काही वेळातच तो व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे अल्पवयीन विद्यार्थ्याची बदनामी झाली आणि तो मानसिक तणावाखाली गेला आहे.

पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणी खदान पोलिसांनी कुणाल माधवे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २९६, ३५१(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७(बी) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

वादग्रस्त प्रशिक्षकाचा इतिहास

सदर घटना उघडकीस आल्यानंतर, पालक आणि कुस्ती संघटनेतील पदाधिकारी यांच्यामध्ये कुजबुज सुरू झाली आहे. काही पालकांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, यापूर्वीही प्रशिक्षक कुणाल माधवे यांनी अशा प्रकारचे व्हिडिओ आणि छायाचित्रे मोबाईलमध्ये ठेवले असल्याची चर्चा होती, मात्र बदनामीच्या भीतीने कुणी तक्रार करण्याचे धाडस दाखवले नाही. पोलिसांनी त्यांचा मोबाईल तपासात घेतल्यास आणखी बरेच व्हिडिओ आणि फोटो समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

क्रीडा क्षेत्रातील पुनरावृत्ती!

अकोल्यातील क्रीडा क्षेत्रात याआधीही अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत. काही वर्षांपूर्वी कुस्ती कोच, बॅडमिंटन कोच आणि कबड्डी प्रशिक्षक यांच्यावर प्रशिक्षणार्थींच्या विनयभंगाचे आरोप झाले होते. काहींना न्यायालयाने शिक्षा सुद्धा ठोठावली आहे. तरीसुद्धा अशा प्रकारचे प्रकार पुन्हा घडत असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!