Join WhatsApp group

हिरपूरमध्ये घरकुल घोटाळा; चौकशी अहवालानंतरही कारवाई नाही, उपसरपंच पतींचा स्वतंत्र दिनी आत्मदहनाचा इशारा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (दि. १३) ✒️ प्रेमराज शर्मा

येथे ग्रामपंचायत सदस्याने पक्के घर असतानाही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेत घरकुल न बांधता शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात चौकशी अहवाल स्पष्ट आल्यानंतरही चार महिने उलटून गेले, तरी प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.

उपसरपंच काजोल रवीकुमार शिंदे यांनी 8 नोव्हेंबर 2024 रोजी लेखी तक्रार केली होती. वारंवार तोंडी व लेखी पाठपुरावा करूनही चौकशी न झाल्याने पंचायत समितीने 10 डिसेंबर 2024 रोजी चौकशी समिती नेमली. तीन महिन्यांनंतर मिळालेल्या अहवालात स्पष्ट नमूद आहे की, संबंधित लाभार्थ्याने घरकुल बांधले नाही, तरी शासनाची फसवणूक करून तीन हप्त्यांचे धनादेश काढून घेतले.

अहवालात पक्के घर असताना योजनेचा लाभ घेणे हा नियमभंग असल्याचे नमूद करून, संबंधितावर फौजदारी कारवाई व निधी वसुलीची शिफारस करण्यात आली होती. मात्र, आजतागायत कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, उपसरपंच पती रविकुमार मधुकर शिंदे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना 13 ऑगस्ट 2025 रोजी लेखी निवेदन देऊन, येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की, या प्रकरणात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कोणाला तरी पाठीशी घालत आहेत की संपूर्ण यंत्रणाच यात गुंतलेली आहे, याबाबत गंभीर संशय आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!