Join WhatsApp group

Ads

अकोल्यात खळबळ: आमदारांपर्यंत पोहोचली बिश्नोई गँगची सावली

By Sarkar Maza

February 19, 2026 5:17 pm

Ads

अकोला : दिनांक १९: जिल्ह्यातील राजकारण आणि कायदा-सुव्यवस्थेला हादरा देणारे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. अकोला शहरातील भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याला कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीने ‘सिग्नल’ ॲपद्वारे संदेश पाठवत ही मागणी केली. या संदेशात आकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडून २ कोटी रुपये वसूल करून देण्यास सांगण्यात आले असल्याचे समजते.

अन्यथा शहराध्यक्ष व आमदार या दोघांनाही गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

ही धमकी सुमारे तीन-चार दिवसांपूर्वी एका ॲप कॉलद्वारे देण्यात आल्याची माहिती आहे. धमकी मिळताच संबंधित पदाधिकाऱ्याने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. अकोला पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला असून सध्या तपास प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे अधिकृत तपशील देणे शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

दरम्यान, घटनेची गंभीरता लक्षात घेऊन संबंधित भाजप पदाधिकाऱ्याला बंदूकधारी पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. तसेच आकोट शहर व परिसरातील संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तैनात करून तांत्रिक तपासाला गती देण्यात आली आहे.

पोलिसांकडून धमकी देण्यासाठी वापरलेल्या क्रमांकांचा मागोवा, ‘सिग्नल’ ॲपशी संबंधित डिजिटल माहिती, कॉल रेकॉर्ड्स तसेच संभाव्य आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.या घटनेमुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!