Join WhatsApp group

Ads

दुष्काळाने हिरावला आणखी एक आधार; चिखली कासवीत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यूसततची नापिकी, कर्जबाजारीपणाचे संकट

By Sarkarmzanews

October 10, 2026 12:01 pm

Ads

मूर्तिजापूर : शेतात पिकले नाही, हातात पैसा उरला नाही आणि कर्जाचा भार वाढत गेला… अशा कठीण परिस्थितीत चिखली कासवी येथील ४२ वर्षीय शेतकरी दिगंबर अरुण वाघ यांचा शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरासमोरील विहिरीत मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी कुटुंबांसमोरील संकट पुन्हा ऐरणीवर आले आहे.

दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना उत्पन्नाची शाश्वती नसताना कर्जाची परतफेड, घरखर्च आणि आगामी हंगामाची चिंता अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर दिगंबर वाघ यांच्या मृत्यूची घटना मन सुन्न करणारी ठरली आहे.

आमदार हरीश पिंपळे यांची कुटुंबीयांना भेटदिगंबर अरुण वाघ यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर आमदार हरीश पिंपळे यांनी दवाखान्यात जाऊन मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची तसेच गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले.

दरम्यान, वाघ यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाची पार्श्वभूमी समोर येत असली, तरी मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी अधिकृत तपासातील निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत.

शेतकऱ्यांच्या वेदना आकडेवारीत मावणार कशा?

सरकार माझा न्यूजचा सवाल : दुष्काळाच्या काळात मदतीच्या घोषणा होतात, पंचनामे होतात आणि आश्वासनांची खैरात केली जाते. मात्र, संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वेळेत आर्थिक मदत, कर्जाच्या ताणातून दिलासा आणि मानसिक आधार मिळतो का? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

दिगंबर वाघ यांच्या मृत्यूच्या घटनेच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ आकडेवारी म्हणून नव्हे, तर त्यांच्या जगण्याशी जोडलेला गंभीर विषय म्हणून पाहण्याची गरज आहे. संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना वेळेत मदत मिळावी आणि अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, हीच अपेक्षा.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!