Join WhatsApp group

गुंतवणुकीच्या नावाखाली डॉक्टरची ६४ लाखांची फसवणूक – सायबर पोलीसांची तत्पर कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळेल, असे सांगत स्थानिक वयोवृद्ध डॉक्टरला तब्बल ६४.५ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या दोन तरुणांना गुजरातमधून अटक करण्यात आली. सायबर पोलिसांच्या तपास पथकाने अहमदाबादमध्ये छापा टाकून दोघांना ट्रान्झिट रिमांडवर अकोला येथे आणले. न्यायालयाने आरोपींना १५ जुलै २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

फोनवरून सुरू झाला गंड्याचा खेळ

७६ वर्षीय डॉक्टर जयंतीलाल दुल्लबजी वाघेला यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले. विश्वासात घेत विविध खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करून घेतले. नफा न मिळाल्याने डॉक्टरांनी संशय घेताच, फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

सायबर पोलीसांची तत्पर कारवाई

सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सायबर पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला. निरीक्षक मनीषा तायडे, पीएसआय सागर फेरन आणि त्यांच्या पथकाने सखोल तपास करून कांजीकुमार वल्लभभाई गुडालिया (२८) व चिराग भरतभाई गुडालिया (२६) या अहमदाबाद येथील तरुणांना अटक केली.

कोठडीत चौकशी सुरू; ४.५ लाख जप्त

पोलिसांनी आतापर्यंत ४.५ लाख रुपये जप्त करून ते न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयात सादर केले. उर्वरित रक्कम आणि अन्य गुंतवणूकदारांचा तपास सुरू आहे.

फसवणुकीचा नवा प्रकार

या प्रकरणामुळे शेअर मार्केटच्या नावाखाली होत असलेल्या सायबर फसवणुकीचा नवा प्रकार उघडकीस आला असून, नागरिकांनी अनोळखी कॉलर्सच्या गुंतवणूक प्रस्तावांना प्रतिसाद देताना विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!