Join WhatsApp group

अकोल्यातील शाळांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम : विद्यार्थी झाले सजग डिजिटल नागरिक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : डिजिटल युगात वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. खंडेलवाल विद्यामंदिर आणि देवकाबाई देशमुख विद्यालय येथे आयोजित या कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, वैयक्तिक माहितीचे संरक्षण आणि ऑनलाइन गुन्ह्यांपासून बचावाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

खंडेलवाल विद्यामंदिर येथे झालेल्या कार्यशाळेत शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. साबू आणि समन्वयक डॉ. दीप्ती पेटकर यांच्या सहयोगाने कार्यक्रम पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम यांनी “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार डिजिटल सवयी विकसित होतात,” असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर्स संघातील विद्यार्थिनी कु. अदीती जनोरकार आणि तनुजा घोगरे यांनी विद्यार्थ्यांना फेक अकाउंट्सपासून सावधानता, फसवे संदेश ओळखणे, सोशल मीडियाचा विवेकी वापर याबाबत मार्गदर्शन केले.

दरम्यान, देवकाबाई देशमुख विद्यालय, मुख्य शाखा, अकोला येथे देखील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका सौ. पोकले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. विशेष मार्गदर्शक म्हणून कु. अदीती जनोरकार आणि तनुजा घोगरे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व, इंटरनेटचा सुरक्षित वापर, वैयक्तिक माहितीचे संरक्षण याविषयी प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे जागरूक केले.

दोन्ही कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले तसेच मोबाईलचा योग्य व जबाबदार वापर करण्याची शपथ देण्यात आली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या उपक्रमांमुळे अकोल्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाइन सुरक्षिततेबाबत जनजागृती होऊन भविष्यात ते सजग व जबाबदार डिजिटल नागरिक म्हणून घडतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!