Join WhatsApp group

राजकारणाच्या नावाखाली गायींची तस्करी आणि जमीन हडप ; नगरसेविकेच्या पतीचा सहभाग उघड

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला दिनांक : ०३ जुलै २५ 🖊 जयप्रकाश मिश्रा, अकोला

अकोला जिल्ह्यात सध्या गायींच्या तस्करीचा धंदा भरात असून, यामध्ये आता गुन्हेगारांसोबत राजकीय नेते आणि त्यांच्या नातेवाईकांचाही सहभाग उघड होत आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या महिला नगरसेविकेच्या पतीला गायींची चोरी आणि तस्करी प्रकरणात अकोला एलसीबीकडून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच पक्षाचा दुसरा नगरसेवक, जो अटकेतील व्यक्तीचा भाऊ आहे, तो जमिनीच्या बेकायदेशीर बळकावणाऱ्या टोळीत सामील असल्याचे समोर आले आहे.

राजकीय छत्राखाली गुन्हेगारीचं वाढतं जाळं

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हेगार टोळ्यांकडून नागरिकांच्या रिकाम्या भूखंडांवर बेकायदेशीर कब्जा केला जात असून, त्याबदल्यात जमिनीच्या मालकांकडून खंडणी उकळली जात आहे. डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका भूखंडावर तब्बल ९० लाखांची मालमत्ता असल्याचा दावा करत फलकही लावण्यात आला. वास्तविक मालकाने भूखंड विक्रीचा प्रयत्न केल्यावर टोळीने त्याच्याकडून १० लाखांची खंडणी मागितली आणि तक्रारीनंतर ही रक्कम २० लाखांपर्यंत वाढवण्यात आली.

पोलिसांची भूमिका संशयास्पद

या प्रकरणात पोलिसांवर पक्षीय दबाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून, तक्रार दाखल असूनही पोलिसांकडून तपासाच्या नावाखाली वेळकाढूपणा सुरू आहे. पीडित भूखंड मालकाने आपल्या कुटुंबाला मुंबईला हलवले असून, त्यांच्यावर मानसिक दबाव आणला जात आहे. विशेष म्हणजे, आरोपीकडून खंडणी घेतल्याचा पुरावा असलेले प्रतिज्ञापत्रही पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात जमिनीवर कब्जा स्वीकारून ती सोडण्यासाठी १.५० लाख रुपये घेतल्याचा उल्लेख आहे.

गुन्हेगारांचा राजकीय आधार बनतोय धोक्याची घंटा

या प्रकरणात सहभागी असलेले अनेकजण पांढरपेशा मुखवटे घालून राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावरतात. पोलिसांनी चौकशी केली असता पीडित पक्षाच्या वकिलाला समेटासाठी १० लाखांचा सौदा करण्याचा दबावही आणला गेला आहे, असे समजते.

गुन्हेगारीचे जाळे आता फक्त गलिच्छ राजकारणापुरते मर्यादित राहिलेले नसून, त्याला पोलिस प्रशासनाचा शिथीलपणा आणि राजकीय हस्तक्षेप यांची जोड मिळत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते. प्रशासन आणि न्याय यंत्रणेला जर वेळेत जाग येणार नसेल, तर सामान्य नागरिकांचा विश्वास संपूर्ण यंत्रणेशी उडाल्याशिवाय राहणार नाही.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!