Join WhatsApp group

Ads

तुषार सायानी यांच्या संशयास्पद अपघाताची सखोल चौकशी करा!लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना निवेदन;

By Sarkarmzanews

October 10, 2026 6:37 pm

Ads

चार महिन्यांनंतरही वाहनाचा शोध न लागल्याने कुटुंबीयांचा संशय

अकोला | प्रतिनिधी

अकोला शहराबाहेरील येवता टी-पॉईंटजवळ एप्रिल महिन्यात झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या जठारपेठ परिसरातील तुषार रविंद्र सायानी (वय ३८) यांच्या मृत्यूच्या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे, सचिव राजेंद्र देशमुख, अंबादास तल्हार, जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांच्यासह पदाधिकारी, सदस्य तसेच सायानी कुटुंबीय उपस्थित होते.तुषार सायानी हे अकोला एमआयडीसीमधील स्वस्तिक इंडस्ट्रीजमध्ये मागील सुमारे वर्षभरापासून सुपरवायझर म्हणून कार्यरत होते.

२० एप्रिल २०२६ रोजी रात्री इंडस्ट्रीजमध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पांडे नावाच्या मजुराचा रात्री सुमारे १.२० वाजता तुषार यांना फोन आला होता. त्यानंतर ते दुचाकीने घटनास्थळी जात असताना येवता टी-पॉईंटजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

या अपघातात तुषार यांचा मृत्यू झाला. मात्र, मृतदेहाची झालेली अवस्था आणि घटनास्थळी परिस्थिती पाहता हा केवळ अपघात होता की या घटनेमागे अन्य काही कारण आहे, याबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. तुषार यांचे वडील रविंद्र सायानी यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

घटनेला चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही संबंधित अज्ञात वाहनाचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे सांगण्यात आले असले तरी परिसरातील इतर मार्गांवरील तसेच घटनास्थळापासून काही अंतरावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, अशी मागणी महासंघाने केली.

तसेच तुषार यांना रात्री फोन करणाऱ्या व्यक्तीसह त्या रात्रीच्या घटनाक्रमाशी संबंधित व्यक्तींचीही आवश्यक त्या पद्धतीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. घटनेला अधिक काळ लोटल्यास संभाव्य पुरावे व महत्त्वाचे धागेदोरे मिळविण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तपासाला गती देण्याची गरज असल्याचे महासंघाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले.

या प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लेव्हलकर यांच्याशीही या प्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली. सायानी कुटुंबीयांना तपासासंदर्भात आवश्यक ती मदत करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणात अपघात की घातपात, याबाबत कोणताही निष्कर्ष अधिकृत तपासातून अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी व्यक्त केलेला संशय आणि महासंघाने केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस तपासातून वस्तुस्थिती स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकार माझा न्यूजचा सवाल

चार महिन्यांहून अधिक काळ उलटूनही अज्ञात वाहनाचा शोध लागला नसेल, तर तपासाची सद्यस्थिती काय आहे? परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि घटनाक्रमाशी संबंधित सर्व धागेदोरे तपासण्यात आले आहेत का? या प्रश्नांची अधिकृत तपासातून उत्तरे मिळणे सायानी कुटुंबीयांसाठी महत्त्वाचे आहे.

यावेळी मृतकाचे वडील रविंद्र सायानी, विक्रम सायानी, राजेश सोड्डा, रसिकभाई कारिया, मनोहर मोहोड, बुढन गाडेकर, रमेश समुद्रे, संतोष मोरे, दीपक शिरसाट, अजय वानखडे, सागर दनोरीकर, नरेंद्र देशमुख, इर्शाद अहमद, जमीर जे. के., समीर खान यांच्यासह अनेक पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Article

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

तुषार सायानी यांच्या संशयास्पद अपघाताची सखोल चौकशी करा!लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना निवेदन;

दुष्काळाने हिरावला आणखी एक आधार; चिखली कासवीत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यूसततची नापिकी, कर्जबाजारीपणाचे संकट

दुष्काळात टँकरच्या पाण्याचा हिशेब कोण देणार?

पत्रकार निखिल देशमुख यांना मारण्याचा प्रयत्न?म्हैसांग येथील घटनेने खळबळ

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!