Join WhatsApp group

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध २१ कामांचे भूमिपूजन व लोकार्पण – अकोला जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान; २ हजार ५८८ कोटी ५५ लाख रू. निधीतून विकासकामे

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला दि. ११ : प्रेमराज शर्मा : अकोला जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक म्हणजेच २ हजार ५८८ कोटी ५५ लाख रूपयांच्या निधीच्या विविध २१ विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. सिंचन, रस्ते, रूग्णालय सुधारणा, सांस्कृतिक भवन, तरण तलावासह विविध प्रशासकीय इमारती अशा विकास कामांमुळे जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान होणार आहे.

विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार सर्वश्री रवींद्र चव्हाण, हरिष पिंपळे, प्रकाश भारसाकळे, वसंत खंडेलवाल, किरण सरनाईक, श्याम खोडे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, पोलीस महानिरीक्षक रामराव पोकळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधिक्षक अर्जित चांडक आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन, अद्ययावत व सुसज्ज इमारतीचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वागत कक्ष, हिरकणी कक्ष, आनंदी कक्ष, आवश्यक दस्तऐवज मिळण्यासाठी किऑस्क सुविधा आदींचे निरीक्षण केले. त्यानंतर नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी ऑनलाईन पद्धतीने विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

अकोला येथील तहसील, तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अद्ययावत इमारतीचे तसेच महिला व बालविकास भवनाचे लोकार्पण झाले. पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सुमारे ४५४.६२ कोटी रूपयांच्या निधीतून सिंचनाची व्यवस्था निर्माण होऊन शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी संशोधनाचा वारसा असलेल्या अकोला भूमीत २४९.४१ कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला.

अकोला शहरात अमृत 2.0 योजनेत 629.06 कोटी रू. निधीतून मलनि:सारण (टप्पा-1) चे काम, तसेच शहरासाठी १८.९९ कोटी रू. निधीतून प्रधानमंत्री ई-बस सेवा योजनेत ई-बस डेपो व चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन झाले. त्याचप्रमाणे, १५ कोटी रू.निधीतून अद्ययावत सांस्कृतिक भवन, सुमारे ९.९६ कोटी रू. निधीतून ऑलिंपिक दर्जाचा तरणतलावाचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.

‘हायब्रीड ॲन्युइटी’अंतर्गत मुर्तिजापूर-दहिगाव-गुडधी-उमरी- अकोला राज्य महामार्ग २८४, तसेच अकोला-मलकापूर- कानशिवणी-मोरगांव काकड- बोरगांव खुर्द जिल्हा प्रमुख मार्गाची सुधारणा ४१०.१० कोटी रू. निधीतून होणार आहे. त्याचे भूमिपूजन यावेळी झाले. त्याचप्रमाणे, उकळी बाजार-नेर- नांदखेड- किनखेड राज्य महामार्ग २७८, किनखेड ते दहिहंडा महामार्गाची सुधारणा, अकोट मतदारसंघातील राज्यमार्ग क्र.४७ रावेर, पातूर्डा, पिंपळगाव, खांडवी, जळगाव जामोद- हिवरखेड- अकोट या मार्गावरील (रंभापूर ते हिवरखेड ते वारखेड भाग) सुधारणा ३११.४४ कोटी निधीतून होत आहे. बार्शिटाकळी शहरात ९.९९ कोटी रू. निधीतून मुख्य रस्ता होत आहे. या कामांचे भूमिपूजन झाले.

सर्वोपचार रुग्णालयात १५१.५६ कोटी रू. निधीतून नवीन वॉर्ड इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांसाठी सुविधा निर्माण होणार असून त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

अकोला येथे १२९.२३ कोटी निधीतून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दक्षतानगर येथे २४६ निवासस्थाने व परिसर विकासकामांमुळे कर्तव्याप्रती २४ तास बांधील असणाऱ्या पोलीसांसाठी निवासाची सोय निर्माण होणार आहे. तसेच ५ कोटी खर्चाचे अकोला तालुका क्रीडा संकुल या कामांचे कोनशिला अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

मूर्तिजापूर तालुक्यातील हिवरा कोरडे, तसेच पारद येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन व बार्शिटाकळी तालुक्यातील भेंडीमहाल येथे ४५ कोटींच्या १० मेगावॅट क्षमतेच्या व रेडवा गाव येथे ९ कोटींच्या २ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. अकोला जिल्ह्यातील अकोला व अकोट या दोन शहरांमध्ये ९ कोटी रू. निधीतून सीसीटिव्ही प्रकल्पाचे लोकार्पणही यावेळी झाले.

प्रारंभी पालकमंत्री तथा कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मेळघाटातील प्रतिकृती भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या अकोला विमानतळ येथे आगमनप्रसंगी पालकमंत्री ॲड. फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, जिल्हाधिकारी अजित कुंभार आदींनी स्वागत केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!