Join WhatsApp group

बाळापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – १४ किलो गांजा, एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त आरोपी अटकेत

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १६ : बाळापुर : अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या ग्राम पारस येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी १४ किलो गांजा, एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक राऊंड जप्त केले. या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे ४,५०,००० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात एका २२ वर्षीय तरुणास अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध प्रचलित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन बाळापूर येथील ठाणेदार अनिल जुमळे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, ग्राम पारस येथील आरोपी अंकित प्रकाश इंदोरे (वय २२) हा त्याच्या राहत्या घरातून गांजाची विक्री करत आहे. तसेच, त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल असल्याचीही माहिती मिळाली. यावरून पोलीसांनी तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

गुप्त माहितीची पुष्टी झाल्यानंतर पोलीसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत आरोपीच्या घराची झडती घेतली. या झडतीदरम्यान आरोपीच्या घरातून १४ किलो गांजा, एक देशी पिस्तूल आणि एक राऊंड जप्त करण्यात आले. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ४,५०,००० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

संपूर्ण तपासानंतर आरोपी अंकित प्रकाश इंदोरे याला तातडीने अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार एनडीपीएस अॅक्ट आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे, उपनिरीक्षक प्रियांका पाटील, आणि पोलीस अंमलदार गोपालसिंह ठाकूर, अनंत सुरवाडे, अंकुश मोरे, संजय ताले, साहिल खान, निखील सूर्यवंशी, सदीप पेड, सचिन कांड, सुरेश बाळसाकळे, प्रविण अवचार, चालक सिद्धार्थ कोहचाडे आणि वानखडे यांनी मोठ्या शिताफीने ही कारवाई केली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!