Join WhatsApp group

Ads

--

वाढत्या घटनांविरोधात बजरंग दल आक्रमक; पीडितांना त्वरित न्याय द्या

By Sarkar Maza

February 17, 2026 7:54 pm

Ads

अकोला : १७ फेबुवारी : शहरात हिंदू महिलांवर कथितपणे वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बजरंग दल यांनी तीव्र भूमिका घेत प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. अशा प्रकरणांतील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, खटल्यांची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावी आणि पीडितांना त्वरित न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.

बजरंग दलाचे विदर्भ प्रांत सहसंयोजक सूरज भगेवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक प्रेमाचे आमिष दाखवून तसेच इतर मार्गांनी महिलांना लक्ष्य करीत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या प्रकारांमुळे समाजात भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने विशेष लक्ष देत तातडीने गुन्हे नोंदवावेत, आरोपींना अटक करून तपास जलदगतीने पूर्ण करावा, तसेच दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पीडित महिलांना कायदेशीर मदत, समुपदेशन व आवश्यक संरक्षण देण्याची गरजही संघटनेने व्यक्त केली.

संघटना कोणत्याही निर्दोष व्यक्तीविरोधात नसून गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तींवरच कारवाई व्हावी, अशी भूमिका भगेवार यांनी स्पष्ट केली. महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने “झिरो टॉलरन्स” धोरण स्वीकारावे, असेही त्यांनी नमूद केले.

या मागण्यांनंतर शहरात महिला सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून पोलिस प्रशासनाच्या अधिकृत भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!