Join WhatsApp group

हातगाव ग्रामपंचायत विरोधी आंदोलन तीव्रतेकडे – भ्रष्टाचार, विकासअडथळा, प्रशासनाकडून दुर्लक्षाचा आरोप

Photo of author

By Sarkarmzanews

Share

हादगाव ग्रामपंचायतीविरोधात नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होत असून, सुरेश जोगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन आता पाचव्या दिवशी प्रवेशले असून, अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.

ग्रामपंचायतीत कथित भ्रष्टाचार, अवैध बांधकामे, रस्त्यांचे निकृष्ट काम, निधीचा अपव्यय तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील सर्वात मोठी असल्याचा उल्लेख करत आंदोलकांनी विकासकामे संथ गतीने अथवा पूर्णतः थांबल्याचा आरोप केला आहे.

आरोप गंभीर – लाखोंचा भ्रष्टाचार

सुरेश जोगळे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, सरपंच व उपसरपंच यांच्या कार्यकाळात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची असून, त्याचा थेट फटका गावकऱ्यांना बसत आहे. अनेक अवैध बांधकामांवर देखील ग्रामपंचायतीने कारवाई न केल्याचे आरोप होत आहेत.

प्रशासनाची उदासीनता – संताप अधिकच

या गंभीर आरोपांनंतरही अद्याप कोणताही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचलेला नाही, ही बाब गावकऱ्यांच्या नाराजीस कारणीभूत ठरत आहे. ग्रामपंचायतपासून ते तालुकास्तरीय प्रशासनापर्यंत “साठे लोटले जात आहेत” अशी चर्चा गावात रंगली आहे.

चर्चा – आंदोलन मोडण्याचा प्रयत्न

सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी आंदोलन मोडण्यासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप देखील होत असून, आगामी निधी वाटपाच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याची शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सामाजिक व राजकीय पाठिंबा – आंदोलनाला बळ

या आंदोलनाला आता विविध सामाजिक संघटना तसेच काही राजकीय घटकांचा पाठिंबा जाहीर झाला आहे. त्यामुळे आंदोलन अधिक व्यापक आणि प्रभावी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुरेश जोगळे यांनी स्पष्ट केले आहे की, तोडगा निघेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. चौथ्या दिवशीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया न आल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

आता पुढे काय?

हादगाव ग्रामपंचायतीतील आंदोलन किती व्यापक रूप धारण करते आणि प्रशासन त्यावर कोणती भूमिका घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!