Join WhatsApp group

Ads

गोड पदार्थांच्या बाजारात धोक्याची घंटा; अकोल्यात खव्यावर अन्न व औषध प्रशासनानची मोठी कारवाई

By Sarkarmzanews

September 25, 2026 10:03 am

Ads

अकोला | प्रतिनिधी

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने अकोला शहरात खाद्यपदार्थांच्या तपासणीला वेग दिला आहे. २४ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या कारवाईत बनावट असल्याचा संशय असलेला खवा/मावा आणि अस्वच्छ परिस्थितीत वाहतूक करण्यात आलेला खवा असा एकूण १,०९७ किलो साठा जप्त करण्यात आला.

या साठ्याची अंदाजे किंमत ₹१२ लाख ९४ हजार ३०० असल्याचे प्रशासनाने सांगितले.अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अकोला शहरातील निमवाडी ट्रॅव्हल्स स्टँडवर तपासणी केली. यावेळी गुजरातमधून एका ट्रॅव्हल्सच्या डिक्कीतून आणलेला खवा/मावा आढळून आला. हा खाद्यपदार्थ अस्वच्छ वातावरणात वाहतूक (Unhygienic Condition) करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने त्याचे ५ अन्न नमुने घेण्यात आले आणि संबंधित साठा जप्त करण्यात आला.

यानंतर सिंधी कॉलनी परिसरातील एका गोदामावर कारवाई करण्यात आली. तेथून १२० किलो बनावट खवा/मावा जप्त करण्यात आला.

बिलांच्या तपासणीत व्यापाऱ्यांची नावे समोर

प्रशासनाने केलेल्या प्राथमिक चौकशीत उपलब्ध बिलांच्या आधारे वैभव गणेशराव मोडक (पाटील), पियुश नागवाणी, कमल शर्मा आणि संदिप निरंकारी इत्यादी व्यापाऱ्यांनी सदर खवा मागविल्याचे निष्पन्न झाल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मात्र, खवा बनावट असल्याचे अंतिम स्वरूप प्रयोगशाळेतील तपासणी व नियमानुसार पुढील कार्यवाहीवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे नमुन्यांच्या अहवालाकडे आता लक्ष लागले आहे.

जप्त खवा नष्ट करण्याची प्रक्रिया

अस्वच्छ परिस्थितीत वाहतूक केल्याचे आढळलेल्या जप्त खाद्यपदार्थाची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू असून तो अकोला महानगरपालिकेच्या SWM Processing Plant, भोड येथे नष्ट करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

ही कारवाई श्री. एस. डी. केदारे, सह आयुक्त (अन्न), अमरावती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. डी. जी. वीर, सहाय्यक आयुक्त (अन्न), अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. आर. डी. सोळंके आणि श्री. कि. ह. बोरचाटे, अन्न सुरक्षा अधिकारी, अकोला यांनी केली.

सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी मोठा इशारा

सणांच्या काळात मिठाई आणि खव्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे मिठाई किंवा खवा खरेदी करताना नागरिकांनी उत्पादनाचा स्रोत, पॅकिंग, तारीख आणि विक्रेत्याची माहिती तपासणे आवश्यक आहे.

संशयास्पद खाद्यपदार्थ आढळल्यास प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सणाचा गोडवा वाढवताना आरोग्याशी तडजोड होऊ नये—खवा खरेदी करताना ग्राहकांनीही आता अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!