Join WhatsApp group

Ads

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तताअतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय

By Sarkarmzanews

February 9, 2026 4:48 pm

Ads

अकोला : धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला आहे. परक्राम्य लिखत अधिनियम (एन.आय. अ‍ॅक्ट) कलम १३८ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर सुनावणी करताना, आरोपीविरुद्ध आवश्यक असलेली कायदेशीर देयता सिद्ध न झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.


न्यायालयीन सूत्रांनुसार, जुने शहर परिसरातील तुषार अरुण धारस्कर यांनी आपल्या वकिलामार्फत डाबकी रोड येथील सागर अरविंद भिरड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. आरोपी “श्री संतकृपा सराफ” या नावाने व्यवसाय करीत असून व्यवसाय विस्तारासाठी त्याने तक्रारदाराकडून ७ लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.

परिचयाच्या आधारे तक्रारदाराने वेळोवेळी रक्कम दिली असून त्याबाबत जमा पावत्या घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
तक्रारदाराने उर्वरित रक्कम मागितल्यानंतर आरोपीने ५ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र संबंधित धनादेश बँकेत सादर केल्यानंतर तो अनादरित झाला. त्यानंतर तक्रारदाराने कायदेशीर नोटीस पाठवून १५ दिवसांत रक्कम भरण्याची मागणी केली होती. नोटीस मिळूनही रक्कम न भरल्याने न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली.


या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी क्रमांक ३ यांच्या न्यायालयात झाली. आरोपीतर्फे अ‍ॅड. रितेश अग्रवाल यांनी बाजू मांडताना, तक्रारदाराने सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीकडून पूर्वीच दोन कोरे स्वाक्षरीत धनादेश घेतले होते व त्यापैकी एका धनादेशाचा गैरवापर करून त्यावर जास्त रक्कम भरल्याचा युक्तिवाद केला.


दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व सादर केलेले पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने धनादेशाचा संभाव्य गैरवापर झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निरीक्षण नोंदवले. तक्रारदाराकडून ५ लाख रुपयांची कायदेशीर देयता ठोसपणे सिद्ध न झाल्याने आरोपीस एन.आय. अ‍ॅक्ट कलम १३८ अंतर्गत दोषी ठरविता येत नसल्याचे सांगत न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!