Join WhatsApp group

Ads

----

एक धागा, अनेक जीव धोक्यात ; प्रशासन कधी उघडणार डोळे?

By Sarkarmzanews

January 3, 2026 12:15 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक ०३ : शहरात सध्या चायनीज मांजाची (नायलॉन/ग्लास कोटेड दोरी) बेकायदेशीर विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.सण-उत्सवांचे वातावरण असो वा साधा रविवार—लहान मुलांच्या हातात चकऱ्या आणि त्यावर चढवलेला चायनीज मांजा हा गंभीर धोक्याचा विषय बनला आहे. समज नसलेल्या लहान मुलांना या मांजाची घातकता कळत नसली तरी त्यातून घडणारे अपघात मात्र जीवघेणे ठरत आहेत.

चायनीज मांजा अत्यंत तीक्ष्ण असल्याने गळा, हात, पाय कापले जाणे, दुचाकीस्वारांच्या मानेवर मांजा अडकून गंभीर जखमा होणे, तर काही ठिकाणी मृत्यूचे प्रकारही समोर आले आहेत. पक्षी, प्राणी यांच्यासाठीही हा मांजा प्राणघातक ठरत असून अनेक पक्षी जखमी अवस्थेत आढळतात. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, छतांवर अडकलेला मांजा नागरिकांसाठी कायमस्वरूपी धोका निर्माण करतो.

शहरात बंदी असतानाही चायनीज मांजाची सर्रास विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. याकडे पोलिस प्रशासन, नगरपालिका तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. केवळ कारवाईच नव्हे तर सातत्यपूर्ण तपासणी, विक्रेत्यांवर कठोर दंडात्मक कारवाई आणि बेकायदेशीर साठ्याची जप्ती करणे अत्यावश्यक आहे.

पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. “खेळ” म्हणून हातात दिलेला मांजा क्षणात जीवघेणा ठरू शकतो, याची जाणीव पालकांनी ठेवणे गरजेचे आहे. यासोबतच शाळांमधून विद्यार्थ्यांना चायनीज मांजामुळे होणाऱ्या धोक्यांविषयी जनजागृती करणे, मार्गदर्शन सत्रे घेणे व सुरक्षित पतंग उडवण्याबाबत माहिती देणे ही काळाची गरज आहे.

चायनीज मांजा हा केवळ एक धागा नसून समाजासाठी गंभीर धोका आहे. वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासन, पोलीस, शाळा आणि पालक—सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन चायनीज मांजाविरोधात ठोस कारवाई व जनजागृती केली, तरच मुर्तिजापूर शहरातील नागरिकांचे आणि निष्पाप मुलांचे प्राण सुरक्षित राहू शकतील.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!