Join WhatsApp group

Ads

अकोला महापालिका निवडणूक : भाजपचा आत्मविश्वास की आत्मघात?

By Sarkarmzanews

December 29, 2025 9:07 pm

Ads

अकोला : दिनांक : २९ : अकोला महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय हालचाल अधिक तीव्र होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे साजिद पठाण आमदार झाल्यानंतर अकोल्याच्या राजकारणात मोठा बदल जाणवू लागला. त्या विजयानंतर काँग्रेसने पक्षसंघटन अधिक मजबूत करत तळागाळात पकड वाढवली, हे वास्तव नाकारता येत नाही. आता हाच फॉर्म्युला महानगरपालिका निवडणुकीतही वापरला जाईल का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजपसाठी ही निवडणूक सोपी राहणार नाही, अशी चिन्हे सध्या स्पष्ट दिसत आहेत. विशेषतः घटक पक्षांमधील वाढते अंतर भाजपसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. “हम साथ-साथ”चा नारा देणारे काही सहकारी पक्ष आता अंतर ठेवताना दिसत आहेत. यामुळेच तिसरी आघाडी आकाराला येण्याची शक्यता चर्चेत आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांची नाराजी ही भाजपसाठी आणखी एक डोकेदुखी ठरू शकते. दुसरीकडे, आमदार साजिद खान पठाण यांचे मुस्लीम व बहुजन समाजावर असलेले मजबूत नेतृत्व आणि प्रभाव हा विरोधकांसाठी मोठा प्लस पॉईंट मानला जात आहे. या दोन घटकांचा एकत्रित परिणाम भाजपच्या गणितावर निश्चितच प्रभाव टाकू शकतो.

भाजप नेतृत्वाबाबतही स्थानिक पातळीवर कुजबुज सुरू आहे. काही नेत्यांचा अती आत्मविश्वास आणि वर्चस्ववादी भूमिका हीच पक्षासाठी ‘धोक्याची घंटा’ ठरू शकते, अशी चर्चा जनतेत होत आहे. “निवडणूक आपल्या हातात आहे” या भावनेतून घेतलेले निर्णय भाजपला महागात पडू शकतात, असा सूर विरोधक लावत आहेत.

याशिवाय, यंदा मोठ्या प्रमाणात अपक्ष व तथाकथित डमी उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. हे उमेदवार मतांचे विभाजन करतील आणि त्याचा फटका थेट भाजपला बसेल, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे. विशेषतः काही प्रभागात मतांचे सूक्ष्म विभाजन निकालावर मोठा परिणाम करू शकते.

एकंदरीत, अकोला महानगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई न राहता, भविष्यातील जिल्हा परिषद व पंचायत सिमिती निवडणुकांची राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक ठरण्याची चिन्हे आहेत. भाजपने वेळीच आत्मपरीक्षण करून रणनीती बदलली नाही, तर ही निवडणूक पक्षासाठी आव्हानात्मक ठरू शकते. तर काँग्रेस व संभाव्य तिसरी आघाडी यांच्यासाठी ही संधीची खेळी ठरू शकते, यात शंका नाही.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!