Join WhatsApp group

यशोगाथा : आरोग्य सेविकेच्या तत्परतेने मजुराचे प्राण वाचले

Photo of author

By Sarkarmzanews

Share

तेल्हारा (जिल्हा अकोला) | दि. १३ डिसेंबर

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहेगाव अवताडे हे शांत आणि साधे गाव. मात्र दि. १० डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडलेल्या एका थरारक घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.

कापूस घेऊन जाणारा ट्रॅक्टर मजुरांसह गावातून जात असताना रस्त्यावर आडवी आलेली विजेची तार ट्रॅक्टरला लागली. यामुळे ट्रॅक्टरवरील मजुरांना जोराचा विद्युतशॉक बसला.

या दुर्घटनेत अजर मोहम्मद अजर (वय २२, रा. अकोट) यांना तीव्र विद्युतशॉक बसून ते जागीच बेशुद्ध पडले. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच परिसरात धावपळ सुरू झाली.

विजेच्या तारांचा मोठा आवाज ऐकताच आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका रूपाली तुपोने या तात्काळ घटनास्थळी धावून आल्या. त्या वेळी काही नागरिक बेशुद्ध मजुराला चुकीच्या पद्धतीने हाताळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी लोकांना बाजूला सारत, योग्य वैद्यकीय पद्धतीने तत्काळ सीपीआर (CPR) देण्यास सुरुवात केली.काही मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर अजर यांना शुद्धी आली.

त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी तात्काळ हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वेळीच उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

या घटनेनंतर गावकरी, नातेवाईक तसेच स्थानिक नागरिकांनी आरोग्य सेविका रूपाली तुपोने यांच्या तत्परतेचे आणि कर्तव्यदक्षतेचे मनःपूर्वक कौतुक केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करत,”आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रशिक्षण आणि तात्काळ निर्णयक्षमता किती महत्त्वाची असते, याचे हे उत्तम उदाहरण आहे,” असे मत व्यक्त केले.

दि. १० डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेत आरोग्य सेविकेच्या निर्णयक्षमतेमुळे व कौशल्यपूर्ण सीपीआरमुळे एका तरुण मजुराचा अमूल्य जीव वाचला, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!