Join WhatsApp group

राज्यात शीतलहर तीव्र; पशुधन संरक्षणासाठी कृषि विभागाचे आवाहन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुंबई : दिनांक ९ : (डॉ. विनोद पुंडगे) सध्या राज्यात थंडीचे प्रमाण अचानक वाढले असून अनेक भागांत शीतलहरीचा प्रकोप जाणवत आहे. या वातावरणातील तीव्र बदलामुळे शेतकरी व पशुपालकांच्या पशुधनामध्ये आजारपण, मृत्यू आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक अशा उपाययोजनांची माहिती देत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नवजात वासरे, कालवडी/गोऱ्हे, मेंढ्या-शेळ्यांची करडी, दुभती जनावरे, आजारी किंवा अशक्त पशुधन तसेच श्वसनविकार असलेले प्राणी हे शीतलहरीच्या काळात सर्वाधिक जोखमीचे मानले जातात. हायपोथर्मिया, फ्रॉस्ट बाइट, श्वसनविकार, भूक मंदावणे, सांधे दुखणे, खोकला यांसारख्या समस्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

काय करावे?

  • स्थानिक हवामानाचा अंदाज अद्ययावत ठेवावा.
  • पशुधनाचा निवारा चहूबाजूंनी संपूर्ण आच्छादित ठेवून थंड वाऱ्यापासून संरक्षण करावे.
  • पत्र्याच्या छतावर वाळलेल्या गवताचा थर व आत जमिनीवर वाळलेल्या चाऱ्याचा बिछाना टाकावा.
  • अतिथंडीच्या रात्री निवाऱ्यात कृत्रिम प्रकाश किंवा उष्णतेची सोय करावी.
  • अशक्त व नवजात पशुधनासाठी पोती/बारदान झाकण्याची व्यवस्था ठेवावी.
  • शेकोटी करताना धूर गोठ्यात जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.
  • जनावरांना कोमट पाणी दिवसातून चार वेळा द्यावे.
  • पुरेसा चारा, पशुखाद्य, जंतनाशके, पूरक खाद्य आणि क्षारांचे मिश्रण साठवून ठेवावे.
  • रोगप्रतिबंधक लसीकरण वेळेत करावे.
  • गोठा स्वच्छ ठेवून बाह्य परजीवी नियंत्रणासाठी निरगुडी, तुळस, लेमन ग्रास यांच्या जुड्या टांगाव्या.

काय करू नये?

  • पशुधनास उघड्यावर बांधू नये किंवा मोकाट सोडू नये.
  • या काळात पशुमेळावे टाळावेत.
  • जनावरांना थंड पाणी देऊ नये.
  • गोठ्यात ओलसरपणा, धूर किंवा गार हवा येईल अशी व्यवस्था ठेवू नये.
  • मृत जनावरांचे शव कुरणात किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये.

शेळी-मेंढी पालनातील आवश्यक काळजी

  • रानात किंवा स्थलांतरित पद्धतीच्या कळपांना उबदार निवारा देणे अत्यावश्यक.
  • शरीरात ऊर्जा निर्माण होण्यासाठी कर्बोदक युक्त खाद्य द्यावे परंतु अॅसिडोसिस टाळावी.
  • शीतलहरीच्या काळात लोकर कापणी टाळावी.
  • वेळापत्रकानुसार लसीकरण तसेच औषधांचा पुरेसा साठा ठेवावा.

कुक्कुटपालनासाठी आवश्यक सूचना

  • पक्षी शेडच्या जाळ्यांना पडदे लावून रात्री थंडीपासून संरक्षण करावे.
  • शेडमधील तापमान २१ ते २३ अंश सेल्सियस दरम्यान राखावे.
  • विजेचे बल्ब, ब्रुडर किंवा शेगडीद्वारे उबदार वातावरण निर्माण करावे.
  • आहारात इलेक्ट्रोलाइट्स व जीवनसत्वांचा समावेश करावा.
  • गादी कोरडी आणि स्वच्छ ठेवून बुरशी वाढ होण्यास प्रतिबंध करावा.
  • पक्षांना कोमट पाणी द्यावे आणि लसीकरण वेळेत करावे.

पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना आवाहन केले आहे की शीतलहरीच्या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास पशुधनाचे प्राण वाचू शकतात तसेच आर्थिक नुकसानही टाळता येते. राज्यातील सर्व पशुपालकांनी जागरूक राहून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!