Join WhatsApp group

मोदी नंतर मुर्तीजापुरात ‘दोन चहावाले’! शहराच्या राजकारणात

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर | २७ ऑक्टो. २५ : प्रेमराज शर्मा :

शहराच्या गल्लीबोळापासून ते चौकातील टपऱ्यांपर्यंत, चहाच्या कपातून निघणाऱ्या वाफेत सध्या राजकारणाचा नवा सुगंध दरवळतोय. कारण, मुर्तीजापुर शहरात सध्या सर्वाधिक चर्चा होतेय ती “दोन चहावाल्यांची”!

होय, एकेकाळी ग्राहकांसाठी चहाचे दोन घोट देणारे हे चहावाले आता जनतेच्या मनात नेतृत्वाचे चहाचे उकळते भांडे बनले आहेत. शहरातील पारंपरिक राजकीय नेत्यांची झोप हरवून टाकणारी ही “चहावाला जोडी” येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा रिंगणात उतरून विरोधकाला चटका देणार अशी कुजबुज सुरू आहे.

एका बाजूला — समाजकार्यातून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा, गरिबांसाठी लढणारा आणि लोकांशी थेट संवाद ठेवणारा ‘सामाजिक कार्यकर्ता चहावाला’,


तर दुसऱ्या बाजूला — स्पष्ट बोलणारा, अन्यायाविरोधात उभा राहणारा आणि ‘बोलण्यात मोदींची झलक’ दाखवणारा ‘स्पष्टवक्ता चहावाला’.

दोघांचे स्वभाव वेगळे, पण ध्येय एकच — मुर्तीजापुर बदलायचं!

शहरातील राजकीय समीकरणं बदलवणारी ही नवी जोडी आता पारंपरिक पक्षांच्या डावपेचांना आव्हान देत आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्थानिक पॅनेलमधील नेतेमंडळी सध्या या चहावाल्यांच्या लोकप्रियतेमुळे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.

सोशल मीडियावर दोघांच्या चर्चेने तापलेल्या पोस्ट्स फिरताना दिसतात, शहरातील अनेक युवक या दोघांमागे उभे ठाकले असून ‘युथ पॉवर’ या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचं विश्लेषकांचं मत आहे.

निवडणुकीपूर्वीच या दोघांच्या नावावर इतकी चर्चा रंगल्याने, मुर्तीजापुरात येणारी निवडणूक केवळ ‘सत्तेसाठी लढाई’ राहणार नाही — तर ‘चहावाल्यांची क्रांती’ म्हणून इतिहासात नोंदली जाईल, अशी चर्चा शहरात जोमात सुरू आहे.

“मोदींनी देश बदलला, आता हे दोघे शहर बदलतील!” — असा नवा नारा मुर्तीजापुरात जोर धरतोय.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!